सांगली जिल्ह्यात ६७ लाख दस्तऐवजांमध्ये २९६०० कुणबी नोंदी, जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम
By अशोक डोंबाळे | Updated: December 12, 2023 21:34 IST2023-12-12T21:34:32+5:302023-12-12T21:34:44+5:30
राज्य शासनाकडेही माहितीचे सादरीकरण

सांगली जिल्ह्यात ६७ लाख दस्तऐवजांमध्ये २९६०० कुणबी नोंदी, जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम
सांगली : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात ६७ लाखांवर अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात २९ हजार ६०० पर्यंत कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जिल्हास्तरावर शोधलेल्या कुणबी नोंदीचा अहवाल न्यायमूर्ती शिंदे समितीला प्रशासनाने सादर केल्याचेही सांगण्यात आले. दस्तऐवजाची पडताळणी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विशेष कक्षाची स्थापना केली असून त्यांच्याकडून कुणबी नोंदींची शोध मोहीम चालूच आहे.
महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलिस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमि अभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म-मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी ११ शासकीय कार्यालयांतील विविध अभिलेखे तपासले आहेत. तसेच १९ हजार ६४७ अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत १० तहसील कार्यालये व एक अपर तहसील कार्यालयाच्या २२ लाख ४३ हजार ९१८ नोंदी तपासण्यात आल्या. तसेच अन्य कार्यालयांतून ४५ लाख दोन हजार ३५२ नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यामध्ये २९ हजार ६०० कुणबी मराठा व कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. या नोंदीचा प्राथमिक अहवाल न्यायमूर्ती शिंदे समितीला जिल्हा प्रशासनाकडून सादर केला आहे.
‘जात पडताळणी’कडून ४४५ प्रमाणपत्रे
जात पडताळणी कार्यालयाकडून ४४५ जणांना कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अथवा कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. एकूण ४९२ जणांनी जात वैधता प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यापैकी ३१ प्रस्ताव प्रलंबित आहेत तर १६ प्रस्ताव कागदपत्रे अपूर्ण असल्याने प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. शाळा सोडल्याचा दाखला, जन्म-मृत्यू नोंद दाखला, वंशावळ आदी कागदपत्रांच्या नोंदी तपासून हे दाखले देण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील कुणबी नोंदी
महापालिका क्षेत्र: १२६६
वाळवा : १६,७१७
पलूस : ९४५
जत : ३
आटपाडी ६०
शिराळा : ४,८५२
कवठेमहांकाळ ४५३
तासगाव : ८७१
मराठा कुणबी नोंदी संकेतस्थळावर
दस्तऐवजाच्या तपासणीनंतर कुणबी नोंदी आढळल्यास याची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधितांनी आपली वंशावळ शोधून तसे अर्ज करावेत. याची पडताळणी करून संबंधितांना मराठा कुणबी, कुणबी मराठा दाखला देण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.