मिरजेत आलेले २५ प्रवासी कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:20+5:302021-06-30T04:18:20+5:30
मिरज : एसटी व रेल्वेतून परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेकडून सक्तीने काेराेना चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी मिरजेत ...

मिरजेत आलेले २५ प्रवासी कोरोनाबाधित
मिरज : एसटी व रेल्वेतून परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेकडून सक्तीने काेराेना चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी मिरजेत ९५४ प्रवाशांच्या चाचणीत २५ प्रवासी कोरोनाबाधित आढळले. या प्रवाशांना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे. परजिल्ह्यातून येणारे प्रवासी कोरोनाबाधित आढळत असल्याने शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे.
सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रेल्वेस्थानक, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी भाजी बाजारात सक्तीने अँटिजन चाचणी सुरू केली आहे. मंगळवारी सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांनी आरोग्य विभागाच्या पथकाकडून एसटी स्थानक व रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची चाचणी केली. ९५४ प्रवाशांच्या तपासणीत २५ जण बाधित आढळले. या सर्वांची महापालिका कोविड केंद्रात रवानगी करण्यात आली.
मिरजेत कर्नाटकातून आलेल्या चार बस महात्मा फुले चाैकात थांबवून त्यातील १७९ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यात सहा प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले. महापालिका वैद्यकीय विभागाने कोरोना चाचणी मोहीम हाती घेत डॉ. रेखा खरात, डॉ. अक्षय पाटील, डॉ. धुमाळ, डॉ. नाैसिन कापशीकर यांची चार वैद्यकीय पथके तयार केली आहेत. शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी पथकाकडून अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. परराज्यातून व परजिल्ह्यातून येणारे बाधित प्रवासी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढवत असल्याचेही चाचण्यांतून स्पष्ट झाले.