२४ डॉक्टरांना बडतर्फीची नोटीस

By Admin | Updated: July 3, 2014 01:01 IST2014-07-03T00:53:28+5:302014-07-03T01:01:06+5:30

कामावर हजर होण्याचे आवाहन : कंत्राटी ६२ डॉक्टरांवरही होणार कारवाई

24 deadline for doctors | २४ डॉक्टरांना बडतर्फीची नोटीस

२४ डॉक्टरांना बडतर्फीची नोटीस

सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील अस्थायी २४ डॉक्टरांना चोवीस तासात कामावर हजर न झाल्यास सेवेतून बडतर्फ करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे़ तसेच सर्व शिक्षा अभियानकडील ६२ डॉक्टरांवरही दोन दिवसात बडतर्फीची कारवाई करण्यासाठी राज्य शासनाच्या हालचाली सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ राम हंकारे यांनी दिली़
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे तास केंद्र आणि राज्य शासनाप्रमाणे निश्चित करावेत, सेवांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमासंबंधी प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावेत, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए पुन्हा सुरू करा, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील बारा हजार डॉक्टरांनी बेमुदत असहकार आणि सामुदायिक राजीनामा आंदोलन सुरु केले आहे़ महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून त्यांचे पदाधिकारी मुंबईत बेमुदत उपोषणाला बसले आहेत़ या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील १३० डॉक्टरांनी राजीनामा देऊन सहभाग घेतला आहे़ यामध्ये अस्थायी २१ आणि पदपात्र तीन डॉक्टरांचाही समावेश असून त्यांना बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे आणि डॉ़ हंकारे यांनी चौवीस तासात सेवेत हजर न झाल्यास बडतर्फ करण्यात येईल, अशी नोटीस बजावली आहे़ हे डॉक्टर चोवीस तासात रूजू न झाल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई निश्चित होणार आहे़ उर्वरित १०६ डॉक्टर नियमित सेवेत असून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया राज्य शासनाकडून सुरु असल्याचेही लोखंडे यांनी सांगितले़
सर्व शिक्षा अभियानामधून बालकांचे आरोग्य तपासणीसाठी ६२ कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे़ या डॉक्टरांनीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे़ यामुळे त्या डॉक्टरांवरही दोन दिवसांत बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
बावीस डॉक्टरांवरच जबाबदारी
जिल्ह्यातील १३० डॉक्टरांनी राजीनामे देऊन आंदोलनात सहभाग घेतला आहे़ यामुळे आंतरवासीत आणि बीएएमएस २२ डॉक्टरांवर ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवा देण्याची सूचना दिली आहे़ ते तेथील कामकाज करीत असून, आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही़ तसेच काही ठिकाणी खासगी डॉक्टरांनाही आरोग्य केंद्रातील सेवा पाहण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती डॉ़ राम हंकारे यांनी सांगितली.
 

Web Title: 24 deadline for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.