कुरळप : तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील फेडरल बँकेत २१६.३६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून ८ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापक राजकुमार शंकर शेरेकर यांनी प्रदीप रघुनाथ गाताडे (रा. गोटखिंडी, ता. वाळवा), प्रमोद तानाजी चौगुले (रा. तांदूळवाडी), शुभम प्रभाकर वडार (रा. कुरळप, ता. वाळवा) या तिघांविरुद्ध शनिवार दि. २१ रोजी कुरळप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तक्रार अर्जात म्हटले आहे, तिघांनी दि. १३ ऑक्टोबर २०२३ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत एकून २१६.३६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने तारण ठेवून फेडरल बँकेची फसवणूक केली आहे. यामध्ये प्रदीप गाताडे याने ५३.२५ ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याची चेन व ब्रेसलेट ठेवून बँकेकडून २ लाख १५ हजार रुपये घेतले तर प्रमोद चौगुले याने ६०.८६ ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याच्या दोन चेन तारण ठेवून २ लाख ५०, तर शुभम प्रभाकर वडार याने १०२.२० ग्रॅम वजनाच्या तीन बनावट सोन्याच्या चेन तारण ठेवून ४ लाख २९ हजार रुपये बँकेकडून घेतले. एकूण २१६.३६ ग्रॅम वजनाचे बनावट सोने ठेवून तिघा संशयितांनी वेळोवेळी ८ लाख ८६ हजार रुपयांची बँकेची फसवणूक केली असल्याचे फेडरल बँकेचे मॅनेजर राजकुमार शंकर शेरेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास कुरळप पोलिस करत आहेत.
Sangli Crime: २२ तोळे बनावट सोने तारण ठेवून ९ लाखांची फसवणूक, तिघा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:38 IST