शिराळा तालुक्यात १८ तलाव कोरडे

By Admin | Updated: March 26, 2015 00:01 IST2015-03-25T23:04:55+5:302015-03-26T00:01:06+5:30

पाऊस पडूनही टंचाई : २३ तलावांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा

18 lakes dry in Shirala taluka | शिराळा तालुक्यात १८ तलाव कोरडे

शिराळा तालुक्यात १८ तलाव कोरडे

शिराळा : शिराळा तालुक्यात गतवर्षी सरासरी पाऊस पडला. तसेच अवकाळी पाऊस पडला असताना तालुक्यातील ४९ पाझर तलावांपैकी मार्च महिन्यात १८ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे तालुक्यात शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर २३ तलावात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. शिराळा तालुका हा टँकरमुक्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील सर्वात जास्त पर्जन्यमान असणारा हा तालुका आहे. यंदा मात्र उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच येथे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील शिंदेवाडी या गावात आठ दिवसांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून या गावाला टँकर द्यावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दाहीदिशा वणवण फिरावे लागणार असल्याची परिस्थिती आहे. अनेक तलावांच्या निकृष्ट कामामुळे या तलावातून पाण्याची गळती होत असल्याने पाणीसाठा कमी होत आहे. शिंदेवाडी या तलावाचे पाणी डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच संपते, तसेच या गावास पाणी पुरवठा योजना नाही. शिंदेवाडी तलाव दोनवेळा बांधला; मात्र निकृष्ट कामामुळे या तलावात पाणीच राहात नाही.
या तलावाबरोबरच जाधववाडी, मादळगाव, निगडी, जुना, शिवरवाडी या तलावांची कामे निकृष्ट झाल्याबाबत अनेकवेळा ग्रामस्थांनी तक्रार करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर अनेक तलावातून बेकायदा उपसाही केला जातो. पाटबंधारे विभागाचे अधिकारी, पाटकरी यांच्या हितसंबंधामुळे मार्च महिन्यातच पाणीपातळी खालावली आहे.
तालुक्यातील ७ लघुपाटबंधारे तलावांपैकी मोरणा मध्यम प्रकल्पात ४५५.१८ द.ल.घ.फू. पाणीसाठा आहे. शिवणी तलावात ३५ टक्के, मानकरवाडी अंत्री ३५ टक्के, तर टाकवे तलावात ३६ टक्के पाणीसाठा आहे. तालुक्याच्या उत्तर भागामध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या करमजाई धरणातील पाणीसाठा १0 टक्केच शिल्लक आहे. त्यामुळे वाकुर्डे बुद्रुक ते मांगलेपर्यंतच्या १४ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तातडीने यावर तोडगा काढून तालुक्यातील टंचाई असलेल्या भागात टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

तलावातील पाणीसाठा...
तालुक्यातील निगडी जुना, बेलदारवाडी, कोंडाईवाडी नंबर २, शिरसटवाडी, औंढी, शिरशी जुना, शिरशी भैरदरा, शिवरवाडी, पावलेवाडी नं. १, भैरववाडी, तडवळे नंबर १, भटवाडी, प. त. शिराळा नंबर २, करमाळे नंबर २, लादेवाडी, इंग्रुळ, सावंतवाडी, शिंदेवाडी हे तलाव कोरडे पडले आहेत, तर पाडळी ४ टक्के, प. त. शिराळा नं. १ - १५ टक्के, पाडळीवाडी ३५, वाकुर्डे खुर्द ४0, निगडी महादरा ३५, आटुगडेवाडी मेणी ३५, तडवळे वडदरा २५, गवळेवाडी उंदीर खोरा ३५, गवळेवाडी बहिरखोरा ४५, हात्तेगाव ८, धामवडे ३0, मेणी १५, बादेवाडी वाकुर्डे बुद्रुक २0, शिरसी कासारकी २५, वाकुर्डे बुद्रुक जामदरा २५, चरणवाडी नंबर १ - १0, तर कापरी ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे बिऊर ३५ टक्के, खिरवडे ४0, शिरसी काळेखिंड १0, पाचुंब्री ३0, भाटशिरगाव ३0, निगडी खोकडदरा १0 टक्के या तलावात ५0 टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तसेच करमाळा नंबर ३- ५५ टक्के, खेड ६0, अंत्री खुर्द ५५, वाडीभागाई ६0, हात्तेगाव अशीलकुंड ५५, कोंडाईवाडी ९0, चव्हाणवाडी ९0 टक्के असा पाणीसाठा आहे.

Web Title: 18 lakes dry in Shirala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.