सांगली जिल्ह्यातील १७२ पतसंस्थांना टाळे, १ हजार २७५ संस्था सुरु; किती कोटींच्या ठेवी.. वाचा

By अशोक डोंबाळे | Updated: July 26, 2025 18:17 IST2025-07-26T18:17:00+5:302025-07-26T18:17:15+5:30

जिल्ह्यात पतसंस्थांत ५ हजार कोटींच्या ठेवी

172 credit institutions closed in Sangli district, 1275 institutions reopened | सांगली जिल्ह्यातील १७२ पतसंस्थांना टाळे, १ हजार २७५ संस्था सुरु; किती कोटींच्या ठेवी.. वाचा

सांगली जिल्ह्यातील १७२ पतसंस्थांना टाळे, १ हजार २७५ संस्था सुरु; किती कोटींच्या ठेवी.. वाचा

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी १९९६ ते २००८ हा कालावधी प्रचंड खडतर होता. अनेक पतसंस्था राजकीय अड्डा बनल्यामुळे दिवाळखोरीत निघाल्या. जिल्ह्यात १९९६मध्ये १ हजार ४४७ पतसंस्था होत्या. गेल्या २९ वर्षांत १७२ पतसंस्थांना टाळे लागल्यामुळे सध्या १ हजार २७५ पतसंस्था सक्षमपणे चालू आहेत. या संस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण मिळविण्यासाठी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचा लढा चालू आहे.

विमा संरक्षण नसतानाही अनेक पतसंस्थांच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय, ही निश्चितच सहकारातील अभिमानाची बाब म्हणावी लागेल. अनेक पतसंस्थांची उलाढाल हजारो कोटींवर गेली आहे. बँकांपेक्षाही मोठे व्यवहार पतसंस्थांमधून होत आहेत. या संस्थांमुळेच ग्रामीणसह शहरीचा विकास झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा पतसंस्थांनी पूर्ण केल्या आहेत. सुरळीत चाललेल्या पतसंस्थांमध्ये १९९६-९७ मध्ये राजकीय हस्तक्षेप वाढून तो राजकीय अड्डाच झाला. 

चुकीच्या पध्दतीने संस्थेतील पैशांची उधळपट्टी केल्यामुळे २००७पर्यंत पतसंस्थांसाठी खूपच अडचणीचा कार्यकाळ होता. १९९६ ते २०२५ या २९ वर्षांच्या कालावधीत ४८७ पतसंस्थांना टाळे लागले. 'सहकार शताब्दी' २००४मध्ये झाली. त्यानंतर दोन तप अनेक पतसंस्था तग धरून आहेत, नव्हे तर प्रगतीच्या शिखरावर गेल्या आहेत.

जिल्ह्यात १९९६मध्ये १ हजार ४४७ पतसंस्था होत्या. आज १२७५ पतसंस्था टिकून आहेत. केवळ १०० पतसंस्थांचा अपवादवगळता अन्य संस्थांच्या प्रगतीचा आलेख उंचावतोय. पंधरा वर्षांपासून पतसंस्थांतील ठेवीना विमा संरक्षणाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. पतसंस्था फेडरेशनकडून प्रयत्नही सुरू आहेत.

तालुकानिहाय पतसंस्था..
तालुका / पतसंस्था संख्या

मिरज - ३७५
वाळवा - २८८
पलूस - १२६
जत - १०६
कवठेमहांकाळ - ८१
खानापूर - ८३
शिराळा - ७८
तासगाव - ६२
आटपाडी - ४३
कडेगाव - ३३

शासनाने ठेवीला विमा सरंक्षण दिल्यास पतसंस्थांची आणखी प्रगती होणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने योग्य निकष निश्चित करावेत, अशी आमची मागणी आहे. ज्या संस्था चांगल्या आहेत. त्यांच्याकडून निधी घेऊन तोट्यातील संस्थांना मदतीचे धोरण ही सहकार विभागाची भूमिका चुकीची आहे. पतसंस्थेच्या वैधानिक राखीव निधीवर आधारित लाखापासून ४० ते ५० लाखांपर्यंत विमा संरक्षणाची मागणी केली आहे. - रावसाहेब पाटील, अध्यक्ष, कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्था, सांगली

Web Title: 172 credit institutions closed in Sangli district, 1275 institutions reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली