जिल्ह्यात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक
By Admin | Updated: August 7, 2015 22:26 IST2015-08-07T22:26:20+5:302015-08-07T22:26:20+5:30
दुष्काळाची छाया गडद : अकरा तलाव कोरडे

जिल्ह्यात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक
सांगली : जिल्ह्यातील ७० टक्के लोकसंख्येला आणि पशुधनाला पाणीपुरवठा करणाऱ्या लहान व मोठ्या ८३ तलावांपैकी अकरा तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. ३४ तलावांमध्ये मृत संचय, तर ३३ तलावांमध्ये २५ ते ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, पावसाने अशीच हुलकावणी दिली, तर या पाणीसाठ्याचाही शेतीसाठी उपसा होणार आहे. परिणामी जिल्ह्यावरील दुष्काळाची छाया गडद झाली आहे. जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिके करपू लागली असून ७७ हजार १९१ हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झालेली नाही. जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये सिध्देवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये बसाप्पावाडी, जत तालुक्यात दोड्डनाला, संख आणि शिराळा तालुक्यातील मोरणा असे पाच मोठे तलाव (मध्यम प्रकल्प) आहेत. नऊ तालुक्यांमध्ये ७८ लहान तलाव (लघु प्रकल्प) असून यामध्ये ९३९८.७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. मान्सून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्या केवळ १६३६.८५ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मोठ्या पाच तलावांमध्येच १२ टक्के पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार केल्यास, दुष्काळाची छाया गडद झाल्याचे दिसत आहे. सध्या जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरजपूर्व तालुक्यांतील माळरानावरील खरीप पिके कोमेजू लागली आहेत. आठवड्याभरात पावसाचा जोर वाढला नाही, तर उर्वरित पिकेही वाया जाण्याची भीती आहे. साखरेचे दर पडल्यामुळे कृष्णा-वारणा नदीकाठच्या ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिलेला नाही. त्यामुळे ते शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप पेरण्या वाया गेल्यामुळे दुष्काळी तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या पदरात पेरणी झालेला खर्चही पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. शासनाने टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची वीजबिले टंचाई निधीतून भरून दुष्काळी भागाला पाणी देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
७७ हजार हेक्टर नापेर
जिल्ह्यातील खरीप पेरणीचे तीन लाख २७ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन लाख ५० हजार ४६४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येथील काही पिके करपली आहेत. उर्वरित ७७ हजार १९१ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणीच झाली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
खरीप हंगामात पेरणी झाली नाही तेथे रब्बीची पेरणी होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पाणीसाठा
तालुका तलाव मृतसंचय कोरडे
तासगाव६३१
खानापूर८७०
कडेगाव६३०
शिराळा४००
क़महांकाळ १०६०
जत२६१०१०
आटपाडी१३४०
मिरज३००
वाळवा१००
एकूण७८३४११
२८ गावे, १६७ वाड्यांना टँकरने पाणी
जत तालुक्यातील उमराणी, खोजनवाडी, डफळापूर, काराजनगी, अमृतवाडी, सिंदुर, बिळूर, उटगी, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंत्राळ, बसर्गी, खंचनाळ, बिरनाळ, व्हसपेठ आदी २३ गावे, खानापूर तालुक्यातील पळशी, हिवरे, घानवड, बाणूरगड, तासगाव तालुक्यातील लोकरेवाडी एक अशी एकूण २८ गावे आणि १६७ वाड्या-वस्त्यांवरील ७१ हजार ३४७ लोकसंख्येला सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. भविष्यात यामध्ये १५७ गावे आणि २४७ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निधी असूनही पैसे भरण्यास शासनाची परवानगी नाही
जिल्हा परिषद प्रशासनाने आॅगस्ट २०१५ पर्यंतचा जिल्ह्याचा ६ कोटी ७३ लाख ६४ हजार रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला होता. या निधीपैकी पाच कोटींच्या निधीची तरतूद ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे वीजबिल भरण्यासाठी केली होती. परंतु, राज्य शासनाने टंचाई नसल्यामुळे सिंचन योजनेचे वीजबिल या निधीतून भरू नये, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी सध्या अखर्चित राहिला आहे.