corona cases in Sangli : वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 18:56 IST2021-05-25T18:55:34+5:302021-05-25T18:56:25+5:30
corona cases in Sangli : सांगली जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामिण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.

corona cases in Sangli : वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण
संतोष भिसे
सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामिण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.
या चार तालुक्यांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. १ एप्रिलपासून दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात तुलनेने रुग्णसंख्या कमी राहिली. ग्रामिण भाग मात्र झपाट्याने बाधित होत गेला. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याने संख्या वाढली. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नियंत्रण न राहिल्याने संसर्ग फैलावला.
दुसऱ्या लाटेच्या ५४ दिवसांत वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार २७ रुग्ण सापडले आहेत. मिरज तालुक्यात ६ हजार ९१० तर जतमध्ये ६ हजार ८६३ रुग्ण आढळले आहेत. खानापूर तालुक्यात ५ हजार ८९७ रुग्ण झाले आहेत.
घरगुती विलगीकरणातील रुग्ण बेजबाबदारपणे वागत असल्याने गावोगावी संस्थात्मक विलगीकरण सुरु करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
शाळा आणि आरोग्य केंद्रांत सोय करण्यास सांगितले आहे. काही गावांनी घरगती विलगीकरणातील रुग्मांनी संस्थात्मक विलगीकरणात न आल्यास गुन्हे दाखल करण्याचे इशारे दिले आहेत. सुपर स्प्रेडर ठरु पाहणारे छुपे रुग्ण बाहेर आल्याने फैलाव नियंत्रणात राहील अशी अपेक्षा आहे.
१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेतील तालुकानिहाय रुग्ण असे : कंसात मृत्यू
आटपाडी ४७७१ (४०), जत ६८६३ (९२), कडेगाव ४१९६ (६२), कवठेमहांकाळ ३३६८ (५१), खानापूर ५८९७ (१२९), मिरज ६९१० (१५३), पलूस २५५१(६६), शिराळा ३०३१(४२), तासगाव ४९४७(११६), वाळवा ७०२७ (१७३), महापालिका क्षेत्र ९१५८ (२७६).
शेतवस्तीचे बुरुज ढासळले
शेतातील वस्त्या गावापासून दूर असल्याने पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहिल्या होत्या. दुसऱ्या लाटेतही कोरोना फिरकणार नाही या आत्मविश्वासात रहिवासी बेजबाबदारपणे वागले. मात्र हा अतिआत्मविश्वास नडला. शेतवस्त्यांवरील सुरक्षेचे बुरुज ढासळले. गेल्या दोन महिन्यांत शेतवस्त्यांवर कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.
कवठेमहांकाळ, जत, तासगावमध्ये पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव
कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव आहे. पुरेशी कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांची नाकेबंदी याबाबतीत स्थिती चांगली नाही. लोक घरातच राहून उपचार घेत असल्यानेही संसर्ग वाढत आहे.
घरगुती विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य देत आहोत. ग्रामपंचायती व कोरोना दक्षता समित्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. या केंद्रांसाठी कोणताही विशेष खर्च होणार नसल्याने अडचण यायचे कारण नाही. विशेषत: शाळांच्या इमारतीत केंद्रे सुरु केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.
- जितेंद्र डुडी,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद