जिल्ह्यात १६२ जागांसाठी १३८३ अर्ज

By Admin | Updated: October 30, 2016 00:54 IST2016-10-30T00:37:03+5:302016-10-30T00:54:38+5:30

नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक : अखेरच्या दिवशी तोबा गर्दी

1383 applications for 162 seats in the district | जिल्ह्यात १६२ जागांसाठी १३८३ अर्ज

जिल्ह्यात १६२ जागांसाठी १३८३ अर्ज

सांगली : जिल्ह्यात पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी जिल्हाभरात ७५० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. जिल्हाभरातील १६२ जागांसाठी १३८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तासगावमध्ये नगराध्यक्षपदासाठी तब्बल ३३ उमेदवार रिंगणात आले असून, पाच नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. निवडणूक आयोगाने आॅफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी दिल्याने व निर्धारित वेळेपेक्षा एक तासाची मुदत वाढवल्याने ही प्रक्रिया सुकर झाली.
जिल्ह्यात आष्टा, इस्लामपूर, तासगाव, विटा आणि पलूस या नगरपालिका, तर कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, शिराळा येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवारी शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक १२२ उमेदवारी अर्ज इस्लामपूरमध्ये दाखल झाले. इस्लामपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण १४ अर्ज दाखल झाले असून, यातील ७ अर्ज शनिवारी दाखल झाले. विट्यात शनिवारी ९२ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी ९, तर शनिवारी ३ अर्ज दाखल झाले आहेत. तासगाव येथे निवडणुकीची खरी चुरस दिसून येत असून, शनिवारपर्यंत २१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा तयार केली होती. मात्र, सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार आणि आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास येणाऱ्या अडचणीमुळे अनेक ठिकाणी कमी अर्ज दाखल झाले होते. अखेर शुक्रवारी आयोगाने आॅफलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुभा दिली. याचा फायदा झाल्याचे दिसून आले. आता दिवाळीनंतर अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शह-काटशहचे राजकारण वाढणार आहे. (प्रतिनिधी)

शिराळकरांचा बहिष्कार
नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिराळा येथे अर्ज दाखल होण्याची शक्यता होती, मात्र शिराळकरांचा निवडणुकीवरील बहिष्कार कायम राहिला आहे. त्यामुळे तेथील निवडणूक स्थगित झाली आहे.

Web Title: 1383 applications for 162 seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.