इटकरे येथील ऊस वाहतूकदाराची १२ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:53+5:302021-07-09T04:17:53+5:30
इस्लामपूर : इटकरे (ता. वाळवा) येथील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहतूकदाराची ऊस तोडणी मुकादमाने १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ...

इटकरे येथील ऊस वाहतूकदाराची १२ लाखांची फसवणूक
इस्लामपूर : इटकरे (ता. वाळवा) येथील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहतूकदाराची ऊस तोडणी मुकादमाने १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली आहे. याबाबत संजय भीमराव डोईफोडे (वय ४७, रा. इटकरे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुबेर शिवाजी चव्हाण (रा. हिंगणी, ता. माण, जि. सातारा) या ऊसतोडणी मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
डोईफोडे हे स्वत:च्या ट्रॅक्टर-ट्रॉल्यामधून राजारामबापू कारखान्यासाठी उसाची वाहतूक करतात. २०१५-१६ च्या हंगामात त्यांनी २० ऊसतोडणी मजूूर पुुरविण्याचा करार कुबेर चव्हाण यांच्याशी केला होता. डोईफोडे यांनी त्याला वेळोवेळी १२ लाख रुपयांची रक्कम दिली. ऑक्टोबर २०१५ मध्ये कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याअगोदर डोईफोडे यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून २० मजूर पाठवून देण्याचा निरोप दिला होता. त्यावेळी चव्हाण याने तुमचा ट्रॅक्टर पाठवून द्या, त्यामधून ही २० मजुरांची टोळी मी पाठवून देतो, असे सांगितले. डोईफोडे यांनी हिंगणे गावी ट्रॅक्टर पाठविला असता त्याच्या घराला कुलूप असल्याचे आणि तो बाहेरगावी निघून गेल्याचे दिसले. त्यानंतर डोईफोडे यांनी चव्हाण याच्याशी वारंवार संपर्क साधला. त्यावेळी त्याने पैसे परत करत नाही, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे डोईफोडे यांनी पोलिसांत धाव घेतली.