सांगलीतून राष्ट्रपतींना ११०० पत्रे
By Admin | Updated: August 20, 2015 22:50 IST2015-08-20T22:50:18+5:302015-08-20T22:50:18+5:30
अंनिसची मोहीम : नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

सांगलीतून राष्ट्रपतींना ११०० पत्रे
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कधी पकडणार, अशा मागणीची सुमारे अकराशे पत्रे सांगलीकरांनी लिहून ती राष्ट्रपतींना पोस्टाद्वारे पाठविली आहेत. अंनिसच्यावतीने बसस्थानकानजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी दिवसभर ही मोहीम सुरू होती.दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.
मारेकऱ्यांना कधी पकडणार, अशी मागणी राष्ट्रपतींकडे लेखी पत्राद्वारे करणार असल्याचे अंनिसने जाहीर केले होते. त्यास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पत्र लिहिताना लोकांच्या मनातील असंतोष व्यक्त झाला. भर दिवसा दाभोलकरांची हत्या झाली असताना, पोलिसांना मारेकरी कसे सापडत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अकराशे पत्रे दिवसभरात लिहून पोस्टाने पाठविण्यात आली. सायंकाळी सांगली पोस्ट कार्यालयातील पत्रे संपल्याने ही मोहीम थांबविण्यात आली. प. रा. आर्डे, सुहास यरोडकर, चंद्रकांत वंजाळे, विकास मगदूम, अॅड. अमित शिंदे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)