सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी पुन्हा वाढ होत नव्या १०८९ रुग्णांची नोंद झाली. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील २१ अशा २३ जणांचा मृत्यू झाला. ९०१ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येतील वाढही कायम असून, शनिवारी नवे पाच रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोनास्थिती पुन्हा गंभीर बनत असल्याचे चित्र असून, चार दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या १५ दिवसात प्रथमच रुग्णसंख्या हजारावर गेली. जिल्ह्यातील २१ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली ३, मिरज, कुपवाड प्रत्येकी १, वाळवा ६, कवठेमहांकाळ ३, जत, शिराळा, कडेगाव प्रत्येकी २ तर मिरज तालुक्यात एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या आठ हजार ५२४ रुग्णांपैकी ९८४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८४१ जण ऑक्सिजनवर तर १४३ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढवत शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २७६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४०६ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८५९९ जणांच्या नमुने तपासणीतून ७०४ जण पॉझिटिव्ह आढळले.
परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर २१ जण नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १४१८४४
उपचार घेत असलेले ८५२४
कोरानामुक्त झालेले १२९३१२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४००८
पॉझिटिव्हिटी रेट ९.७९
शनिवारी दिवसभरात
सांगली १४७
मिरज ४९
आटपाडी ७१
कडेगाव ८८
खानापूर ८२
पलूस १२६
तासगाव ६२
जत ३५
कवठेमहांकाळ ५७
मिरज तालुका ८७
शिराळा ६९
वाळवा २१६
चाैकट
‘म्युकर’चे पाच रुग्ण
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या दोन दिवसांपासून वाढत असून, शनिवारी पाच नवे रुग्ण आढळले.