कामेरीत रविवारी १० जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST2021-04-19T04:24:38+5:302021-04-19T04:24:38+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे रविवारी १० जण कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या ३ ते ४ ...

कामेरीत रविवारी १० जण कोरोनाबाधित
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे रविवारी १० जण कोरोनाबाधित झाले आहेत. गेल्या ३ ते ४ दिवसांपूर्वी मिरज येथे पाठवलेल्या स्वॅबच्या अहवालात कामेरीच्या १० रुग्णांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले. तर, शुक्रवारी ४ व शनिवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ३ दिवसांत १५ जण बाधित झाले आहेत.
सध्या कामेरीत कोरोनाबाधित रुग्णसंख्या ५२ झाली आहे. त्यापैकी एक मृत झाला असून १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ३३ रुग्णांवर होम आयसोलेशनने उपचार सुरू आहेत. त्यामध्ये बहुतांश सौम्य लक्षणे असणारे रुग्ण आहेत व ५ जण इस्लामपूर व कराड येथील कोविड रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी दिली.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले असून बाधितांच्या घरातील व निकट संपर्कातील ४८ जणांचे स्वॅब शनिवारी मिरज येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी गावातील भाजी मंडई बंद केली आहे व होम आयसोलेशनने उपचार घेणारे व विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक व पोलीस कारवाई करण्याचा निर्णय कोरोना दक्षता समितीने घेतला आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा. ४५ व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.