- इरा.एन.जी

2019सालच्या डिसेंबर महिन्यात सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरात सापडलेल्या कोरोना विषाणूनं, आता जगभरातील 211 देशांमधल्या जवळजवळ 20 लाख लोकांना ग्रासलं आहे. भारतात चाचण्यांचं प्रमाण वाढलं की याची व्याप्ती आपल्याला नक्की लक्षात येईल. हा रोग पूर्णपणो नवा असल्यानं त्याच्याशी सामना करायच्या पद्धतीही वेगळ्या आहेत. या पद्धती ठरायला हव्यात त्या त्या-त्या देशाच्या, प्रदेशाच्या भूभागावरून, तिथे राहणा:या  लोकांच्या सवयींवरून. एखाद्या देशानं असं केलं म्हणून सर्वांनीच तसं करायला हवं असं नाही. कोरोनाविरु द्धच्या या लढ्यामध्ये सध्या सात देश यशस्वी होताना दिसत आहेत, आणि  योगायोगाची गोष्ट म्हणजे या सातही देशाच्या  प्रमुख या महिला आहेत. सध्या जगभरातील या सात देशांविषयी चर्चा सुरू आहे ज्यांनी या विषाणूला सध्यातरी थोपवून धरलं आहे. त्यामध्ये आहेत - जर्मनी, तैवान, नॉर्वे, फिनलंड, न्युझीलंड, डेन्मार्क आणि आइसलण्ड. कोण आहेत या महिला नेत्या आणि  काय केलं  त्यांनी आणि त्यांच्या देशानं हा नक्कीच कुतुहलाचा विषय आहे. 

--------------------------------------

 

जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल 

चाचण्या आणि फिरती केंद्रं    

 जर्मन माणूस ओळखला जातो तो त्याच्या थेटपणा आणि अचूकतेबद्दल. ही लोकं अतिशय कमी पण नेमकं बोलतात. करोनानं चीन, इटली, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं असताना जर्मनी मात्न तिथला मृत्युदर 1.4 टक्के  एवढा कमी ठेवण्यात यशस्वी झाली आहे. याचं बरचसं श्रेय जातं ते तिथल्या चान्सलर अँगेला मर्केल यांना. स्वत: फिजिसिस्ट असलेल्या मर्केल यांनी या रोगाचा स्वभाव लवकर ओळखला आणि  त्यानुसार उपाययोजना केल्या. 18 मार्चला त्यांनी जर्मनीमधल्या शाळा आणि  सर्व सार्वजनिक कार्यक्र म बंद केले. फारशा टीव्हीवर न येणा:या मर्केल यांनी आपल्या देशाला संबोधून भाषण केलं. त्या म्हणाल्या ‘ आपली जीवनशैली, आपल्या सवयी,  आपली आयुष्यं यामध्ये आता खूप फरक पडणार आहे, दुस-या  महायुद्धानंतर आता हे करोनाचं संकट आपली परीक्षा पाहाणार आहे’.

 
 मर्केल यांनी तातडीनं करोनाची चाचणी विकसित करून प्रचंड प्रमाणात, घराघरात जाऊन चाचण्या केल्या. घरी खिळून राहिलेल्या रूग्णांची चाचणी करण्यासाठी फिरती केंदं्र, म्हणजे कोरोना व्हायरस टॅक्सीज सुरु  केल्या. यामध्ये ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, आणि  जे स्वत:च्या घरीच विलगीकरणात आहेत, त्यांची तपासणी या केंद्रांद्वारे केली जाते. अशा केंद्रांमुळे दोन फायदे झाले,  एक म्हणजे रूग्णाला ताबडतोब आरोग्यसेवा मिळाली, हॉस्पिटल्सवरचा ताण कमी झाला, आणि हे रूग्ण बाहेर न पडल्यामुळे फैलाव कमी झाला. या फिरत्या केंद्रांमुळेच इतर युरोपीय देशांच्या तुलनेत जर्मनीमध्ये मृत्युंची संख्या खूपंच कमी आहे. 
पण अशी सुनियोजित आरोग्य व्यवस्था एकदम येत नाही, मर्केल यांच्या साथीला होती ती जर्मनीतील सक्षम आरोग्यव्यवस्था. यामुळे लोकांनाही व्यवस्थेबद्दल, सरकारबद्दल विश्वास वाटत होता. या सर्व काळातली त्यांची भाषणंही ऐकण्यासारखी आहे. खास जर्मन स्वभावाप्रमाणो मुद्देसूद, नेमकी आणि  थेट.  विज्ञानावर आधारित, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता आणि  संकटाचा सामना करण्यासाठीची सज्जता ही मर्केल यांची ताकद आहे.

--------------------------------------------

फिनलण्डच्या पंतप्रधान सना मारीन

पहिल्या रूग्णाचा मृत्यूआधीच  लॉकडाऊन


फिनलण्डच्या पंतप्रधान सना मारिन केवळ 34 वर्षाच्या.   त्या जगातील सर्वात लहान वयाच्या पंतप्रधान आहेत. गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाली. 
मारिन यांनी देखील जर्मनी प्रमाणो लवकर निर्णायक पावलं उचलून या रोगाचा प्रभाव कमी केला. करोनामुळे पहिल्या रु ग्णाचा मृत्यु होण्याआधीच मारिन यांनी त्यांच्या देशात लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे रु ग्ण लवकर वाढले नाहीत आणि अमेरिकेसारखा आरोग्ययंत्नणोवर ताणही पडला नाही. एवढ्या लहान वयात एवढी मोठी जबाबदारी पेलायची तयारी कोण आणि कधी करून घेणार? पण सना मारिन या अशाच अवघड काळात एकदाही न डगमगता, चुकीची विधानं, घाई-गडबड न करता, अतिशय आत्मविश्वासानं ही मोठी कामगिरी पार पाडत होत्या. 

 

वेगवान चाचण्यांबरोबरचं, लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहचवण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवली. त्यांनी फेसबुक, इंन्स्टाग्रामसारख्या सामाजमाध्यमांमध्ये जम बसवलेल्या, आणि लाखो चाहते असलेल्या मंडळींची (इन्फ्लुएंसर्स) साथ घेतली.  ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्नाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘फिनलंड हा देश या दिव्यातून पार पडेल हे निश्चित, कारण  फिनिश लोक हे कोणत्याही संकटासमोर हिमतीनं उभे ठाकतात. परिस्थिती कितीही अवघड असली तरीही ‘चला, आपण एकत्न या प्रश्नावर उत्तर शोधू’ अशी त्यांची वृत्ती असते’’. फिनलण्ड सध्या हा लॉकडाऊन कशा पद्धतीनं उठवायचा याच्या विचारात आहे.    


-------------------------------------------

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रीडरिकसन

पन्नास फुटावरच्या दोरीवरची कसरत    
 
डेन्मार्कमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे  ‘स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला ज्या माणसाला वेळ नसतो, तो माणूस स्वत:च्या अवजारांची काळजी न घेणा:या कारागिरासारखा असतो’. युरोपातील देश इटलीमधून पहिली धोक्याची घंटा ऐकू येताच डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रीडरिकसन यांनी हा रोग आटोक्यात आणण्यसाठी काळजी घ्यायला सुरूवात केली. यावेळी इटलीमधल्या 12000लोकांना लागण झाली होती. 11 मार्चला ज्यावेळी डेन्मार्कनं लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा तिथल्या बाधितांचा आकडा होता 514 आणि  ब्रिटनचा आकडा होता 456. लॉकडाऊन करणारा डेन्मार्क हा युरोपातला इटली नंतर दुसराच देश ठरला.  आज या देशात 7 हजारांच्या आसपास रूग्ण आहेत आणि  370 मृत, पण त्यांच्या तुलनेत ब्रिटनमध्ये आज 1 लाख 30 हजारांच्यावर रूग्ण आहेत आणि 17 हजाराच्यावर मृत व्यक्ती! या वाढीचं कारण एकच सांगितलं जातं, ते म्हणजे ब्रिटननं डेन्मार्कच्या नंतर 12 दिवसांनी म्हणजे 23 मार्चला लॉकडाऊन केला. त्यामुळे सुनियोजित लॉकडाऊन केल्यामुळे आणि तिथल्या नागरिकांनीही त्याला लगेच प्रतिसाद दिल्यामुळे इथली मोठी जीवितहानी टाळली गेली. 

 

इथल्या लोकांनी उगीच जास्त खरेदी करु  नये म्हणून इथल्या सरकारनं विशेष उपाय केले. घबराहटीमुळे सगळ्यात जास्त साठा लोकं हॅण्ड सॅनिटायझर्सचा करायला लागले, तेव्हा त्यांनी तिथल्या मॉल्सला एक सॅनिटायझर घेतला तर 5 युरोज किंमत लावत असले तर दोन घेतल्यावर त्याची किंमत थेट 105 करु न टाकायला सांगितलं. त्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणात खरेदी करणंही टाळलं गेलं.   

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रीडरिकसन म्हणतात की, ‘हा लॉकडाऊन करणं म्हणजे 50 फुटावरील दोरीवर कसरत करण्यासारखं आहे, जास्त वेळ तिथे राहिलात किंवा जरी खूप पटकन पुढे गेलात तरीही तुमचा कपाळमोक्षचं झाला म्हणून समजा. त्यामुळे या दोरीवरून सुखरूप बाहेर येण्यासाठी प्रत्येक पाऊल हे योग्यचं पडलं पाहिजे, पण या दिव्यातून बाहेर यायला सातत्यानंर प्रयत्न करतच राहायला हवेत’.  त्यामुळे करोनाशी लढण्याचा हा डॅनिश मार्ग परिणमकारक ठरला तो इथल्या नेतृत्वाच्या पूर्ण विचारांती पण वेगवान निर्णय क्षमतेमुळे. आता डेन्मार्क इथला लॉकडाऊन उठवण्याच्या तयारीत आहे.           
शाळा-महाविद्यालये, पब्ज जरी बंद असली तरी तिथला लॉकडाऊन फार कडक नव्हताचं. कारण त्यांच्या मते अर्थव्यवस्था कोलमडली तर कोरोनाचं संकट आणखीनच तीव्र होईल. त्यामुळे काही नियम पाळून त्यांनी सार्वजनिक कार्यक्र मही सुरु  ठेवले होते. फक्त महिन्याभराच्या काळात दोन आठवडे हे कार्यक्र मही बंद होते. पण यामुळे नागरिकांनी आपणहून काही नियम पाळायला सुरवात केली. स्वत: आरोग्य टिकवण्यासाठी इथे प्रसिद्ध असलेल्या म्हणीप्रमाणे. 
---------------------------------------------------------------

नॉर्वेच्या पंतप्रधान अर्ना सॉलबर्ग

प्रामाणिक प्रयत्न आणि नियमित संवाद
 


  नॉर्वेच्या पंतप्रधान अर्ना सॉलबर्ग यांनी देखील कोरोनामुळे येणारं संकट ओळखून, लवकर चाचण्या सुरु  केल्या. त्यांचा शेजारी देश स्वीडननं अजूनही लॉकडाऊन न केल्यानं नॉर्वेच्या  तुलनेत इथले मृत्यु 10 पटीनं वाढले आहेत. पण सॉलबर्ग यांनी 12 मार्चलाच देशात तातडीच्या उपाययोजना लागू केल्या. इतर यशस्वी देशांप्रमाणोच वेगवान चाचण्या आणि सतर्क आरोग्य कर्मचारी वर्ग यामुळे मोठी हानी झाली नाही.  पण पंतप्रधान सॉलबर्ग यांचं काम लक्षात राहिलं ते एका वेगळ्याच कारणामुळे. कोरोना संकटामुळे अनेक दिवस लहान मुलंही घरी खीळून आहेत, शाळा नाही बाहेर खेळायला जाता येत नाही, पण हे सगळं का, याचं कारणंही नीटसं कळत नाही, असं काहीतरी या मुलांचं होतंय. म्हणून या मुलांच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी त्यांनी मुलांशीच थेट संवाद साधला. मार्चच्या सुरवातीला आयोजित केलेल्या या पत्नकार परिषदेमध्ये कोणत्याही पत्रकारांना निमंत्नण नव्हतं. पण, देशभरातल्या लहान मुलांकडून प्रश्न मागवण्यात आले होते. सॉलबर्ग यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, आणि  मुलांना आवर्जून सांगितलं, ‘ या काळात तुम्हाला थोडं घाबरून गेल्यासारखं होत असेल, मलाही होतं पण ठीक आहे, घाबरणंही ठीकच आहे!’’.


अशा संवादांबरोबरचं सॉलबर्ग यांनी नॉर्वेच्या टेलिनॉर कंपनीबरोबर एक अॅप विकसित केलं. स्मिटनस्टॉप त्याचं नाव. या अँपमुळे लोकं कुठे कुठे जमा होत आहेत, याचा माग काढता येतो आणि  त्यानुसार प्रशासनाला आपलं काम करता येतं. यामुळे एखादी व्यक्ती जर करोना बाधित व्यक्तीच्या आसपास असेल तर तिला याबद्दल निरोप पोहचवला जातो, कि सतर्क राहा, तुम्ही बाधित व्यक्तीच्या जवळ आहात!
-------------------------------------------------------

न्युझीलण्डच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न

आपत्तीचा सामना करण्याची विशिष्ट पध्दत


 न्युझीलण्डमध्ये लोकवस्ती खूपंच विरळ आहे. इथली लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास. आजपर्यंत इथे 1456 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण इथलं बरं होण्याचं प्रमाण खूप आहे, आणि  मृत्युदरही कमी आहे. इथल्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी थेट आणि स्पष्ट शब्दात‘किवी घरी रहा’ असं सांगितलं. 2017 साली पंतप्रधानपदी निवडून आल्यापासून जेसिंडा आर्डर्न विविध कारणानं सतत चर्चेत राहिल्या आहेत. आल्या आल्या त्यांनी सर्व मंत्र्यांनी बैठकांना येताना शक्यतो   ‘कारपूल ’ करून यावं, असं सांगितलं! पंतप्रधानपदी निवडून आल्या तेव्हा त्यांचं वय होतं केवळ 37 वर्ष.


 न्युझीलंडचे नागरिक जेसिंडाबद्दल  ‘ तिच्याशी आम्ही सहज बोलू शकतो, ती आम्हाला आमच्यातलीच एक वाटते’  असं म्हणतात. न्युझीलंडमधले पत्नकार म्हणतात कि आर्डर्न यांनी जे काही केलं ते बाकीच्या देशांपेक्षा फार वेगळं नाही. पण इथल्या लोकांना त्यांचं ऐकावसं वाटतं, ते त्यांचा आपत्तीचा सामना करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे. त्यांच्या भाषणातून निर्णायकता दिसते पण अशा आपत्तीच्या काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बोलण्यात, वागण्यात करूणा, सहानुभूती दिसते.आणि त्यामुळे कोणत्याही आपत्तीच्या काळात त्या यशस्वी ठरतात. 
-----------------------------------------------------

आइसलण्डच्या पंतप्रधान कातरीन जेकोप्सस्तोतीर

प्रत्येकाची चाचणी प्रत्येकाची सुरक्षा

आइसलण्डची लोकसंख्या आहे केवळ 3.5लाख!  आणि  मनुष्यवस्ती अतिशय विरळ. म्हणजे  इथली लोकसंख्या महाराष्ट्रातल्या एखद्या गावात जेवढी असते ना, तेवढी अख्ख्या देशाची आहे! पण इथल्या पंतप्रधान कातरीन जेकोप्सस्तोतीर यांनी ठरवल्या प्रमाणो इथल्या प्रत्येक नागरिकाची करोना चाचणी करून घ्यायची! आज या लहानशा देशानं आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत, आणि त्याही नि:शुल्क. लॉकडाऊन असला तरी खूप कडक नाही. येत्या 4 मे पासून शाळा महाविद्यालयंही सुरु  करण्याचा त्यांचा मानस आहे. पण जिम्स, हॉटेल आणि पोहण्याचे तलाव मात्र बंद राहतील असं सध्यातरी नियोजन आहे. आजपर्यंत ज्या लोकांचा विलगीकरणात असल्यानं पगार बुडाला आहे, त्यांनाही पूर्ण पगार देण्याची घोषणही त्यांनी केली आहे. 


आइसलण्डच्या पंतप्रधान कातरीन जेकोप्सस्तोतीर ग्रीन पार्टीच्या आहेत. आज देशाला सर्वाधिक धोका हा वातावरणातल्या बदलांमुळे आहे असं त्या म्हणतात. यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्याआधी पर्यावरण संवर्धनाविषयी बरचं काम केलं होतं. गेल्या आठवड्यात त्यांनी या कोरोना संकटामुळे जगभरात महिलांवर कसे परिणाम होतं आहेत, महिला यामध्ये नक्की कसं काम करत आहेत, अशा वेळेला महिला अत्याचारांचं वाढतं प्रमाण, मानसिक आजारांचं वाढतं प्रमाण या अशाही विषयांवर  भाष्य केलं. 

--------------------------------------------------------------

तैवानच्या पंतप्रधान इंग-वेन

कसून चौकशी  आणि 124 उपाययोजना    


 
 
विधीविषयक प्राध्यापक त्साइ इंग-वेन या तैवानच्या पहिल्या महिला पंतप्रधान. हा देश चीनच्या अतिशय जवळ असूनही अत्तापर्यंत इथे फक्त 400 लोकांना या रोगाची लागण झाली आहे आणि  6 लोक यामुळे दगावले आहेत. तैवाननं लवकर पावलं उचलून 31 डिसेंबर नंतर देशात आलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी केली आणि सुरक्षिततेच्या 124विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या. कोरोनाचा सामना करण्यासाठी सध्या जगात प्रसिद्ध असलेली लॉकडाऊनचा पर्याय तैवाननं स्वीकरला नाही. अर्थव्यवस्था जपण्यासाठी या देशानं संपूर्णपणो लॉकडाऊन न करता प्रत्येक केसचा पाठपुरावा करण्यावर भर दिला आहे. तैवान प्रमाणोच ऑस्ट्रेलिया हा देशही चीनशी जवळचे व्यापार संबंध असलेला. इथली लोकसंख्या सारखीच असली तरी तैवानपेक्षा खूपंच विरळ आहे. पण तरी आज ऑस्ट्रेलियामध्ये जवळजवळ 7000 रु ग्ण आहेत आणि तैवानमध्ये केवळ 428! 

 


आता तैवान अमेरिकेत आणि युरोपातील इतर देशांना जवळजवळ 10 कोटी मास्कसचा पुरवठा करणार आहे. या प्रयत्नांमुळे सध्या तैवानं करोनाचं संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे जगात सर्वात उत्तम आणि पुढच्या अशा साथींसाठी पथदर्शी आहेत की काय अशी चर्चा आहे.  
या सर्व देशांमध्ये अजून एक समान धागा आहे तो म्हणजे इथली लोकसंख्याही कमी आहे. कदाचित छोटे भूप्रदेश अशा संकटांचा सामना करण्यासाठी योग्य ठरत असतील. आजपर्यंत आपण जे नेते पाहात आलो, ते सर्व शक्तीप्रदर्शन करणारे, स्वत:ची प्रतिमा उंचावणारे आणि इतरांवर दोषारोप करणारे असे. या नेत्यांच्या तुलनेत हे स्त्नी नेतृत्व त्यांच्या निर्णायक, थेट तरी प्रेम आणि करु णोच्या भावनेतून संवाद साधण्याच्या शैलीद्वारे कोरोनाशी लढत आहे. आपल्या देशाचं आरोग्य आणि अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचे हे प्रयत्न नक्कीच दखल घ्यायला लावणारे असेच. 

 

( लेखिका राजकीय आणि सामाजिक विषयांच्या अभ्यासक आहेत)

reach.irang@gmail.com


  


 

Web Title: Why are the seven women leader fighting against Corona inspiring to world?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.