When did you wash the bedsheets and blankets? | तुम्ही चादरी पाघंरूण कधी धुता?
तुम्ही चादरी पाघंरूण कधी धुता?

- सायली राजाध्यक्ष

मी लहान असतानाच्या ज्या गोष्टी मला प्रकर्षानं आठवतात त्यातली एक लख्ख आठवण असलेली गोष्ट म्हणजे माझ्या बाबांना कपड्यांना वास आलेला अजिबात चालत नसे. मी ही 40 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतेय, जेव्हा आपल्या देशात स्वच्छतेच्या कल्पना फारशा योग्य नव्हत्या. 

त्याकाळी आम्ही बीडमध्ये राहात असू. आमचं घर जरासं गावाच्या बाहेर होतं. आधी आजोबांनी आणि नंतर बाबांनी ते उत्तम रितीनं बांधलं होतं. आवश्यक त्या सर्व सोयी केलेल्या होत्या. आमच्या ब-याचशा नातेवाईकांची घरं गावात होती. त्यातल्या काही नातेवाईकांच्या घरी त्याकाळी मैल्याचे संडास होते. शेणानं सारवलेली घरं होती. या घरांमध्ये ढेकूण सर्रास असत. पाली, झुरळांचा मुक्त वावर असे. अर्थात त्याकाळी याचं काही नाविन्य नव्हतं. 
नाविन्य याचं होतं की आमच्या घरी हे नव्हतं. आमच्या घरात ढेकूण नव्हते. घर स्वच्छ  होतं. घरात आधुनिक पद्धतीचं शौचालय होतं. भरपूर हवा आणि उजेड असलेलं घर होतं. 

तर मी सांगत होते ते कपड्यांना येणा-या वासाबद्दल. टॉवेल, रूमाल, नॅपकिन, पांघरूणं, चादरी, उशांचे अभ्रे या अशा गोष्टी आहेत की ज्या फार म्हणजे फार नियमितपणे धुतल्या गेल्या पाहिजेत. रोजचे कपडे आपण धुतोच पण अनेक घरांमध्ये टॉवेल अनेकानेक दिवस धुतले जात नाहीत, तसंच रूमाल आणि नॅपकिनही. मग चादरी, पांघरूणं आणि उशांचे अभ्रे तर विसराच.  

रूमाल आणि टॉवेलांची स्वच्छता

जसे आतले कपडे रोज धुतो तसंच टॉवेल रोज धुतलेच गेले पाहिजेत. टॉवेल जर नीट धुतले गेले नाहीत तर त्याला एक घाणेरडा कुबट वास येतो. बाबांना तो वास अजिबात चालायचा नाही. त्यामुळे मला हे अगदी चांगलं लक्षात आहे. जिथे फार आर्द्रता असते, म्हणजे मुंबईसारखी हवा असते तिथे शक्यतो टर्किश टॉवेल न वापरता पातळ पंचे वापरावेत. पंचे लवकर वाळतात. आर्द्रतेमध्ये कपड्यांना कुबट वास येतो. पातळ पंचे खडखडीत वाळतात त्यामुळे त्यांना वास येत नाही. आर्द्रता असलेल्या ठिकाणी तोंड पुसायचे नॅपकिनही पातळ कपड्याचे वापरावेत.  रूमाल वापरताना तेही पातळ आणि सुती वापरावेत. अनेकांना टर्किश फेस नॅपकिन वापरायची सवय असते. पण पुन्हा तेच होतं. हे रूमाल पावसाळ्यात नीट वाळत नाहीत. 

चादरींच्या स्वच्छतेचं सूत्र
चादरींचं माझं गणित मी सांगणार आहे. माझ्या घरात दोन डबल बेड आहेत या दोन डबल बेडसाठी मी आठवड्यात प्रत्येकी दोन चादरी वापरते. एक चादर दिवसभर घातली जाते आणि दुसरी रात्नी झोपताना. हल्ली बेडकव्हर नामक चादरींचा प्रकारही मिळतो. थोडक्यात दिवसभर घालायच्या चादरी या जाड कपड्याच्या असव्यात. अशा चादरी बेडवर घट्ट राहातात. बेड दिवसभर नीटनेटका राहातो. रात्नीच्या चादरी या पातळ आणि सुती असाव्यात. जयपूर कॉटनच्या चादरी यासाठी उत्तम. 

दिवसाच्या आणि  रात्रीच्या वेगवेगळ्या चादरी खरेदी करायची गरजच नाही. चांगल्या नवीन चादरी दिवसा वापराव्यात आणि  जुन्या होऊन मऊ झालेल्या चादरी रात्नी वापराव्यात. प्रत्येक बेडसाठी दिवसाच्या  दोन आणि रात्रीच्या दोन अशा चार चादरी असाव्यात. जास्त असतील तर उत्तमच. 

अनेकांच्या घरी दिवसेंदिवस चादरी बदलल्या जात नाहीत. चादरी कळकट झालेल्या असतात. लहान मुलं असतील तर शूचे वास येत असतात. पूर्वी अशी घरं सर्रास दिसायची कारण स्वच्छतेच्या कल्पनाच वेगळ्या होत्या. पण आता स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक काळातही अशी घरं बघितली की मला आश्चर्य वाटतं.

 सुती पांघरूणं आणि उशांचे स्वच्छ अभ्रे
पांघरूणांच्या बाबतीतही मी तेच सांगेन. भारतासारख्या समशीतोष्ण हवामानाच्या देशात सुती पांघरूणं सगळ्यात उत्तम असतात. सुती पांघरूण उन्हाळ्यात गारवा देतं आणि हिवाळ्यात ऊब देतं. हल्ली राजस्थानी दोहड खूप लोकप्रिय झाली आहेत. पातळ दोहड वजनाला हलकी आणि पांघरायला सुखावह असतात. थोडा गारवा असलेल्या भागांमध्ये सोलापुरी चादरी हाही एक चांगला पर्याय होऊ शकतो किंवा औरंगाबादच्या जाड हिमरू चादरी हाही. 
पांघरूण निदान आठवड्याला एकदा धुवायलाच हवं. कपड्यांमध्ये बसणा-या बारीक जंतुंमुळे किंवा कपड्यांच्या तुसांमळे अनेकांना शिंका येतात, सर्दी आणि अँलर्जीचा त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय घामानं पांघरूणांना वासही येतो. त्यामुळे पांघरूणं नियमितपणे धुणं गरजेचं आहे. डोक्याखाली घेतो त्या उशांचे अभ्रे दर दोन दिवसाला बदलावेत. अनेकांना भरपूर घाम येतो. त्यामुळे अभ्रे बदलणं आवश्यक आहे.      

परदेशात डुवेट्स वापरतात. थोडक्यात रजया पण त्या सिंथेटिक असतात. पॉलिएस्टर रजया थंडीमध्ये ठीक वाटतात पण उकाड्यात त्या असह्य होतात. पण आपल्याकडेही हल्ली डुवेट्स वापरायचं खूळ आलंय. एसीमध्ये अनेक लोक डुवेट्स वापरतात. एसी प्रचंड गार करून मग डुवेट्स पांघरून झोपण्यामागचं लॉजिक मला तरी कळत नाहीत. कुठे बाहेरगावी गेलो की हॉटेलमध्ये ती डुवेट्स बघितली की विचारानंच मला घाम फुटायला लागतो. त्यामुळे मी हल्ली माझं पातळ पांघरूण बरोबर ठेवते.

रोजचे कपडे धुताना मशीनमध्ये फॅब्रिक सॉफ्टनर घातला किंवा थोडंसं डेटॉल घातलं तर हे कुबट, नकोसे वास टाळणं सहज शक्य आहे. आणि जे सहज शक्य आहे ते का करू नये!
हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात सगळे खूप कामात असतात हे मला मान्य आहे पण थोडंसं नियोजन केलं  आणि घराला थोडी शिस्त लावली तर काहीच अवघड नाही.  

(लेखिका साहित्य, स्वयंपाक आणि जीवनशैलीच्या आस्वादक आहेत) 

sayaliwrites@gmail.com

 

  


Web Title: When did you wash the bedsheets and blankets?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.