Old silk sarees, weaving a new life on clothes, an initiative of women in Goa | सिल्कच्या जुन्या साड्या, कपड्यांवर नवं जगणं विणणारा, गोव्यातील महिलांचा उपक्रम

सिल्कच्या जुन्या साड्या, कपड्यांवर नवं जगणं विणणारा, गोव्यातील महिलांचा उपक्रम


-मनस्विनी प्रभुणे -नायक 

गोव्याची पर्यटनावर आधारित आर्थिक घडी या महामारीच्या काळात पार विस्कळीत झालीय. एक महिना - दोन महिने ठीक होतं, पण आता तब्ब्ल सहा महिने झाले. पर्यटनावर आधारित सेवा पुरवणारे छोटे छोटे जोड धंदे बंद पडले. त्याचा थेट परिणाम घराघरातल्या आर्थिक परिस्थितीवर झाला. गेल्या काही महिन्यांत वास्कोमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली. गोव्यात वास्कोमधील मंगोर हिल कोरोनासाठी हॉटस्पॉट  ठरला. जसजसे कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले तसा हा भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून घोषित झाला. अनेक टॅक्सीचालक, अनेक पायलट (दुचाकीसेवा पुरवणारे), वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगार, सफाई कामगार, घरकाम करणा-या महिला, जवळच असलेल्या वेर्णा औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार हे सारेजण मंगोर हिल परिसरातले रहिवासी. बहुसंख्य कर्नाटकातून स्थलांतरित झालेले मजूर. हा सगळा परिसर कोरोनाच्या विळख्यात सापडल्यावर इथला कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला. फक्त मंगोर हिल परिसरातीलच नव्हे तर अख्ख्या वास्को शहराला आर्थिक समस्येनं वेढलं. काहींनी घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढलं होतं, त्यांची तर अवस्था अधिकच वाईट झाली. 
हे  सारं असं असताना ‘अर्ज’ नावाच्या संस्थेनं इथल्या महिलांना सोबत घेऊन एक आश्वासक असं पाऊल उचललं. त्यातूनच ‘स्टिच इन टाइम’  नावाचा प्रकल्प आकाराला आला. गेल्या बावीस वर्षांहून अधिक काळ अर्ज संस्था या भागात कार्यरत आहे. अर्ज म्हणजे अन्यायरहित जिंदगी. बाललैंगिक शोषण, महिला आणि मुलांची बेकायदेशीर पद्धतीने होणारी तस्करी रोखण्याचं काम अर्जच्या माध्यमातून केलं जातं. अर्जचे संस्थापक अरु ण पांडे सांगतात, कोरोनामुळे उदभवलेल्या आर्थिक संकटाला सामोरं कसं जायचं? महिलांना रोजगार कसा मिळवून द्यायचा? असे प्रश्न संस्थेसमोर होते. संकटसमयी पहिला घाव महिलांनाच बसतो. नवºयाच्या बेरोजगारीचा घावदेखील इथल्या महिलांना बसला. यातून मार्ग कसा काढता येईल यावर गेले काही महिने आम्ही प्रयत्न करत होतो. चित्रकार हर्षदा सोनक यांच्यामुळे आम्ही त्यावर उपाय काढू शकलो.   
अर्जशी अनेक कलावंत, लेखक मंडळी जोडलेली आहेत. चित्रकार हर्षदा सोनक या अर्जच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी असतात. स्वत:ही महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करतात. हर्षदा यांनी हा कल्पक पर्याय सुचवला. 
‘स्टिच इन टाइम’ म्हणजे एकप्रकारे अधिक वाईट वेळ येण्यापूर्वी उचलेलं पाऊल.  ‘स्टिच इन टाइम सेव्हज  नाईन’ अशी एक इंग्रजीत म्हण आहे. म्हणजेच शिवताना मारलेले नऊ टाके उसवण्यापासून वाचवताना आधी एकच टाका घालणं गरजेचं आहे. वस्तीतल्या बहुसंख्य महिलांच्या नव-यांचा रोजगार याकाळात गेला होता. यातल्या अनेक महिला कधी घराबाहेर न पडलेल्या. नवरा नोकरी करणारा, तर या येणा-या छोट्याश्या उत्पन्नातून टुकीने घर चालवणा-या. आर्थिक संकटातून येणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी आज याच महिला खंबीरपणे ‘अर्ज’च्या सोबत उभ्या राहिल्या आहेत. अर्ज आणि हर्षदा यांनी संयुक्तपणे सुरु  केलेल्या या प्रकल्पात लोकांकडून देणगी स्वरूपात मिळविलेल्या कापडावर हाताने वेगवेगळ्या आकर्षक डिझाइन्सच्या माध्यमातून वीणकाम करून सुंदरसे दुप्पटे, ओढणी, स्टोल्स बनविले जातात. चांगले सुस्थितीतले पण न वापरातले कपडे घरात असेच पडून असतात. लोकांना विनंती करून त्यांच्याकडून असे सिल्कचे न वापरातले कपडे गोळा करण्यावर आधी भर देण्यात आला. यालादेखील अनेकांनी छान प्रतिसाद दिला. 


हे काम करताना ज्या महिलांना आपल्या घरी जाऊन काम करायचंय त्या कापड-सुई-धागा घरी घेऊन जातात तर ज्यांच्या घरी पुरेशी जागा नाही त्या ‘अर्ज’ च्या ट्रेनिग सेंटरमध्ये येऊन काम करतात. एकमेकींना मदत करत, मनातील निराशा दूर करत खेळीमेळीनं काम करतात. सध्या या प्रकल्पात वस्तीतील वीस महिला सहभागी झाल्या आहेत. एका दुप्पट्या-एका स्टोल्स मागे या महिलांना ८००  रु पये मिळतील असं आर्थिक मॉडेल तयार करण्यात आलं. तशी ही  रक्कम छोटी आहे. यातून त्यांच्या घरातले सगळे खर्च भागवले जाणार नाही, कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी हे पैसे पुरेसे पडणार नाहीत. पण त्यांची चूल मात्र रोज पेटती असेल..

---------------------

एक धागा.. सुखाचा
चित्रकार हर्षदा सोनक. ती सांगते, महिलांमध्ये शिवणकाम करण्याची काही प्रमाणात अंगभूत अशी कला असते. याच कलेचा उपयोग त्यांच्या हातांना काम देण्यासाठी होऊ शकतो असा विचार माझ्या मनात आला. फक्त या कामाला कलेची जोड द्यायची गरज वाटली आणि यातूनच आता मी देशभरातील वेगवेगळ्या कलाकारांना आवाहन करून त्यांच्याकडे त्यांची डिझाइन्स मागतेय, त्यांना या प्रकल्पाशी जोडण्याचा प्रयत्न करतेय. यामुळे तयार होणाºया उत्पादनाचं महत्त्व वाढेल आणि  हे उत्पादन चांगलं विकलं जाईल. हर्षदाच्या बरोबरीने या प्रकल्पावर समन्वयक म्हणून काम करणारी ज्युलियाना. ती सांगते, गोव्याच्या वेगवेगळ्या भागांतील महिलांनी 
सिल्कच्या साड्या या प्रकल्पासाठी दान केल्या. 
या उपक्रमासाठी तर जुने सिल्कचे कपडे, साड्या द्यायची इच्छा असेल तर arzindia@gmail.com   या इमेल आयडीवर संपर्क करता येईल. 

 

(लेखिका मुक्त पत्रकार आहे.)

manaswinirajunayak@gmail.com

Web Title: Old silk sarees, weaving a new life on clothes, an initiative of women in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.