नवरा बायकोच्या भांडणाचं मुख्य कारण नेमकं काय असतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 15:46 IST2017-08-04T15:44:09+5:302017-08-04T15:46:21+5:30
नवरा-बायकोच्या भांडणाला कारण लागत नाही तरी सर्वाधिक भांडणं कशावरुन होतात हे पाहिलं तर कळते, आंटेदाल की किंमत!

नवरा बायकोच्या भांडणाचं मुख्य कारण नेमकं काय असतं?
नवरा-बायकोत भांडणं होतात, चिक्कार होतात, रोज होतात. ही जगभरची गोष्ट. कुणी त्याला अपवाद नाही. लग्नानंतर भांडय़ाला भांडं लागणारच म्हणत अशा भांडणाकडे दुर्लक्ष करत संसाराचा गाडा हाकला जातोच. हळूहळू ही भांडणं सवयीचीही होतात. कुठल्या विषयावरुन भांडण होणार याचा परस्परांना हळूहळू अंदाजही येऊ लागतो. पण तुम्हाला काय वाटतं, कुठल्या विषयावरुन नवराबायकोत सर्वाधिक भांडणं होत असतील? म्हणजे भांडणाचा मुख्य विषय कोणता? कुणी म्हणेल नवरा बायकोच्या भांडणाला कारण कुठं लागतं, ते कशावरुनही होऊ शकतं. ते कितीही खरं असलं तरी अलिकडेच झालेला एक सव्र्हे म्हणतो की नवराबायकोची सर्वाधिक भांडणं किंवा भांडणाचं मुख्य कारण हे पैसा आणि पैशाचे हिशेब हेच असतं!
अर्थात आपला अभ्यास आपल्याकडे भारतात झालेला नाही. आपल्याकडे नवरा बायको कशावरुन भांडतात हे शोधुन काढणं जास्त इंटरेस्टिंग ठरावं. पण हा अभ्यास झालाय अमेरिकेत. cashlorette या वेबसाईटने केलेल्या अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं की अमेरिकन कपल्सपैकी 60% कपल्स हे पैशावरुन भांडतात.
त्यातही पैसे खर्च करण्याच्या सवयीवरुन आणि पैशाचे हिशेब न देण्यावरुन ही भांडणं जास्त पेटलेली दिसतात. इतकी की याच कारणावरुन सर्वाधिक घटस्फोटही होताना दिसतात.
आणि भांडणांची सुरुवात कशानं होते?
त्यातलं मुख्य कारण म्हणजे, एकजण खूप पैसे उधळतो. खूप शॉपिंग, खूप खर्च करतो.
दुसरं कारण म्हणजे दोघं कमावते असतील तर एकजण दुसर्याच्या सगळ्या पैशांवर हक्क गाजवतो. पैशाच्या वाटणीवरुन भांडणं होतात.
तिसरं म्हणजे बिलं कुणी भरायची? घरातली,विजेची, हॉटेलची बिलं कुणी भरायची यावरुन भांडणं होतात.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरखर्चाच्या पैशाचा हिशेब देत नाही, हिशेब मागितला की भांडण ठरलेलं.
यासार्या गोष्टींवरुन भांडणं तर आपल्याकडेही होतात. खरंतर मनी मॅनेजमेण्ट नाही, हिशेब जमत नाहीत यावरुन होणारी ही भांडणं संसार मोडेर्पयत जाणं वाईट आहे.
मॅरेज कौन्सिलिंगमध्ये यापुढे या ही गोष्टींच्या समावेश करावा लागेल, हे उघड आहे.