जोडीदारासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या पदरी केवळ डिप्रेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 17:18 IST2017-08-08T17:15:56+5:302017-08-08T17:18:17+5:30
नातं टिकावं किंवा पार्टनरला बरं वाटावं म्हणून एकानं खूप तडजोडी केल्या तर त्यांचं नातं अधिक सुदृढ होतं का?

जोडीदारासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांच्या पदरी केवळ डिप्रेशन
-चिन्मय लेले
एकमेकांसोबत रहायचं म्हटलं की, अॅडजस्टमेण्ट करावीच लागते. हे वाक्य म्हणजे जागतिक सत्यच. ‘तो आणि ती’ यांच्या नात्यात तडजोडीला, मन मारण्याला, पडतं घेण्याला पर्याय नाही. त्याशिवाय नातं टिकूच शकत नाही यात काही शंकाच नाही. कितीही प्रेम असलं एकमेकांवर तरी ‘सोबत’ राहताना वाद होतात, भांडणं होतात आणि कुणा तरी एकाला माघार घ्यावी लागते, पडतं घेऊन गप्पं बसावंच लागतं. मन मारावंच लागतं. पण हे असं पडतं घेत मन मारायचं कुणी.?
कोण मन मारत दुसर्यासाठी लहानसहान तडजोडी सतत करतो. सतत काम करून घेतो, सतत लहानसहान गोष्टीत आपल्या मतांचा बळी देतो, मुख्य म्हणजे कोण करतो रोज उठऊन सॅक्रिफाईस.?
सॅक्रिफाईस हा मोठा शब्द असला तरी नातं टिकावं म्हणून, वाद नको म्हणून, केवळ प्रेमापोटी कोण सतत काम करतं, माघार घेतं.?
आणि मुख्य म्हणजे अशी माघार घेत सतत मन मारून कामच करत राहिलं तर त्या दोघांचं नातं पक्कं होतं? वाढतं एकमेकांवरचं प्रेम.?
अलिकडेच प्रसिद्ध झालेला अभ्यास म्हणतो,
-नाही.!
एकानं सतत दुसर्यासाठी खस्ता काढल्या, त्याची कामं केली, माघार घेतली तर नातं जास्त काळ टिकतं. मात्र त्यामुळे ‘त्याग’ करून माघार घेणार्याला आनंद मात्र होत नाही, समाधान वाटत नाही आणि आपल्या पार्टनरविषयी त्यांना ओढही वाटत नाही.
याउलट, जी लोकं कमी तडजोडी करतात, कमी मन मारतात त्यांचं नातं अधिक रसरशित आणि आनंददायी असतं, दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत जास्त आनंदी असतात.
‘त्याग’ करा, एकटे व्हा.!
अमेरिकेतल्या अॅरिझोना विद्यापीठातले प्राध्यापक केसी. जे. टुटेहॅगन यांनी एक अभ्यास केला. नातं टिकावं किंवा पार्टनरला बरं वाटावं म्हणून एकानं खूप तडजोडी केल्या, त्याग केला लहानसहान गोष्टीतही तर त्यांचं नातं अधिक सुदृढ होतं का, मुख्य म्हणजे असा त्याग करणार्या पार्टनरला आनंदी, समाधानी वाटतं का.?
-हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. त्याचे निष्कर्ष मोठे रंजक आहेत.
ते म्हणतात, जे जोडीदार आपल्या जोडीदारासाठी सतत लहानसहान त्याग करतात, मन मारतात, इच्छा नसली तरी त्याच्या वाटेची कामं करतात ते आपल्या नात्यात जास्त ‘कमिटेड’ असतात. नातं टिकावं म्हणूनच ते जीवाचं रान करत असतात. एक उत्तम जोडीदार होण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याचवेळी ते मनातून मात्र सतत असमाधानी असतात, आपल्या जोडीदाराविषयी वाटणारी ओढ कमी होत जाते किंवा त्यांना हळूहळू एकेकटं वाटू लागतं. महत्वाचं म्हणजे एवढं सतत जोडीदारासाठी काही ना काही करूनही त्यांना किंवा त्यांच्या जोडीदाराला त्याचं काही अप्रूप वाटत नाहीच. त्यांचं नातं त्यानं सुधारत नाहीच उलट जो सतत तडजोड करतो, राबतो त्याला गृहीत धरणंच सुरू होतं.
त्याचं कारणही उघडच आहे. हल्ली काम-करिअर यांचा एवढा स्ट्रेस माणसांवर वाढलेला आहे की दिवसभराच्या कामाच्या गाडय़ात आणखी चार कामं जास्त एवढीच त्या ‘त्यागाला’ किंमत.
त्याउलट जी माणसं नात्यात फार मन मारत नाही, दुसर्यासाठी म्हणून स्वतर्ला त्रास करून घेत नाहीत ती जास्त खुशीत असतात. मजेत जगतात आणि अंगाला फार काही लावून न घेतल्यानं रोमान्सबिमान्स करायला मोकळेच असतात.!
‘सायन्स डेली’ला प्रसिद्ध झाल्याप्रमाणे टुटेहॅगन म्हणतात, ‘रोज ढिगानं कामं उपसणारी माणसं केवळ सवयीनं, गरजेपोटी किंवा नको नात्यात आणखी वाद म्हणून परस्परांसाठी काही कामं करतात, पण त्यामुळं त्यांचं नातं बळकट होत नाही. उलट स्ट्रेस वाढतोच.’’
पण मग प्रश्न पडतो की, नात्यात तडजोड करायचीच नाही का.?
त्यावर उत्तर एकच, तडजोड करावीच लागते. पण केवळ नातं टिकावं म्हणून किंवा जोडीदाराला बरं वाटेल म्हणून वाट्टेल तेवढे कष्ट उपसू नयेत. शक्य असेल ते करावं आणि त्याची जाणीवही समोरच्याला करुन द्यावी.
तरच त्या नात्यातून आनंद मिळतो. नाहीतर होते ती केवळ मन मारून कुचंबणा.