मदर्स डे: आईला काय गिफ्ट द्याल?
By Admin | Updated: May 13, 2017 18:05 IST2017-05-13T18:05:37+5:302017-05-13T18:05:37+5:30
मदर्स डे निमित्त आईला गिफ्ट करता येतील अशा पर्सनल ६ गोष्टी.

मदर्स डे: आईला काय गिफ्ट द्याल?
- अनन्या भारद्वाज
मे महिन्याचा दुसरा रविवार जगभर मदर्स डे म्हणून साजरा होतो. बाजारपेठ, जाहिराती तुम्हाला ओरडून ओरडून सांगतील की, मदर्स डेला आईला अमूक गिफ्ट द्या. तमूक गिफ्ट द्या. हे करा, ते करा. यासाऱ्यावर आपली रिअॅक्शन काय असते? दोन प्रकारच्या रिअॅक्शन या डेसंदर्भात मिळतात. पहिली म्हणजे आमचं आमच्या आईवर खूप प्रेम आहे, काही नकोत ही विदेशी फॅडं. कशाला हवेत काही गिफ्ट. आम्ही नाही करत असा खुळचटपणा. दुसरी रिअॅक्शन म्हणजे सेलिब्रेशनचा मूड. बाजारात जायचं, पैसे असतील खिशात खुखुळत म्हणून किंवा आईला महागडं गिफ्ट द्यावंसं वाटतं म्हणूनही दुकानात जावून एक महागडं गिफ्ट खरेदी केलं जातं. ते चकचकीत गिफ्ट आईला परकं, कोरडं वाटू शकतं याची पर्वा मात्र केली जात नाही. या दोन्ही रिअॅक्शन काहीशा टोकाच्याच. आपण आपल्या आईसाठी एरव्ही जे करत नाही किंवा त्यासाठी वेळ काढत नाही असं वाटत असेल तर तेच निदान यादिवशी करुन पाहिलं तर? काय सांगावं, या मदर्स डेला खरंच तिला आपला अभिमान वाटेल.
आणि मुख्य म्हणजे ते करण्यासाठी आपल्याकडे हवी थोडी कल्पनाशक्ती, फार पैसे नसले तरी चालतील, पण हवी थोडी माया, आणि डोक्यात आईचाच विचार. इथं आम्ही काही आयडिया सुचवतो आहोत. तुम्ही डोकं लावलं तर तुम्हालाही बरंच काही सुचेल..
बघा, या आयडिया कशा वाटतात..
१) आई चल, गप्पा मारू आज
किती दिवस झाले तुम्ही आईशी गप्पा मारुन? म्हणजे कामाच्या बोलण्यापलिकडची गप्पांची मैफल जमवून? तिच्या मांडीवर डोकं ठेवून तेल मालीश करुन घेता घेता काहीबाही बोलत, विनाकारण हसून, मस्त गप्पाष्टकं रंगवून? नाही ना वेळ होत?
ते आज करा, जरा गप्पा मारा. पूर्वीच्या, लहानपणीच्या, आजी असतानाच्या, तिच्या आवडीच्या गाण्याच्या, तिनं दिलेल्या बेदम माराच्या. मस्त दोन तास काढा तिच्यासाठी, मनापासून!
२) तिच्यासाठी जमेल एखादा पदार्थ करायला?
आईला काय आवडतं तुझ्या असं विचारलं की अनेकांचा क्लिन बोल्ड होतो. माहितीच नसतं आपल्या आईला कुठला पदार्थ आवडतो. तो माहिती असेल तर स्वत: बनवा. घेवून जा तिच्यासाठी. दुकानात तर सगळंच मिळतं पण लेकीनं किंवा लेकानं स्वत: केलेल्या पदार्थाची चव आईला कळेलच!
३) तिच्या आवडीच्या हॉटेलातली मैफल
आठवतं का आईला कुठलं हॉटेल आवडतं? तरुण असताना आईबाबा कुठल्या हॉटेलात जायचे? नेमके कुठल्या टेबलवर बसायचे? काय खायचे? ते सारं जगता येईल पुन्हा? तिला घेवून जा त्या हॉटेलात, ते कितीही छोटं असलं, जुनं असलं किंवा महागडं असलं तरी. तिच्यासोबत तिथले पदार्थ खावून पहा, मग कळेल मदर्स डेचं गिफ्ट काय असतं.
४) आईच्या मैत्रिणी/बहिणींचं गेटटुगेदर
आईच्या मैत्रिणींना, बहिणींना फोन करुन घरी बोलवा. सरप्राईज द्या आईला. त्यांना गप्पा मारू द्या. आवडीचं खायला द्या. त्यासाऱ्यांचा मदर्स डे हॅपीवाला होवून जाईल.
५) कपाट आवरुन द्या तिचं..
हे जरा अवघड काम. पण करुन बघा. आईला विचारा, तुझं कपाट आवरुन देवू का? ती हो म्हणाली तर तिच्याशी गप्पा मारता मारता ते आवरा. हे म्हणजे त्या कपाटांत कपडे, वस्तू ठेवणं नाही तर आईसोबत एक काळाचा तुकडा, आठवणींचे अनेक तुकडे तुम्ही बोलता बोलता जगून घ्याल.
६) पत्र लिहिता येईल?
अवघड काम. पत्र लिहिलं कधी आईला? मनातलं सांगितलं कधी? नाही ना, करुन पहा. एक पत्र लिहा या मदर्स डेला. त्या पत्रावरची अक्षरं ओली होतात तेव्हा समजायचं आपलं गिफ्ट भरुन पावलं!