ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 13:00 IST2019-01-25T12:58:07+5:302019-01-25T13:00:42+5:30
एका रोमॅंटिक रिलेशनशिपची सुरूवात फारच रोमांचक असते. पार्टनरच्या केवळ विचारानेच चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलायला लागतं.

ड्रग्सप्रमाणे मेंदूवर प्रभाव करतं प्रेमाचं नातं - रिसर्च
(Image Credit : www.livescience.com)
एका रोमॅंटिक रिलेशनशिपची सुरूवात फारच रोमांचक असते. पार्टनरच्या केवळ विचारानेच चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलायला लागतं आणि पार्टनरला बघून हृदयाचे ठोके अधिक वेगाने होऊ लागतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना निर्माण होणारी प्रेमाची भावना मेंदूच्या त्या भागावर प्रभाव टाकते, जिथे कोकीन आणि ओपीयमसारख्या ड्रग्सचा सर्वात जास्त प्रभाव होतो. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.
स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी या अभ्यासात १५ लोकांना सहभागी करून घेतले होते. ज्यात ८ मुली आणि ७ मुलं होते. या १५ जणांना त्यांच्या पार्टनरचे फोटो दाखवत, त्यांच्या हातावर हलकी इजा करण्यात आली. सोबतच या सगळ्यांच्या मेंदूची 'फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग मशीन' द्वारे तपासणी करण्यात आली. त्यासोबतच त्यांना त्यांच्या हातावर करण्यात आलेल्या इजेबाबत विचारण्यात आलं.
अभ्यासकांना यातून आढळलं की, जोडीदाराचा फोटो पाहिल्यानंतर लोकांवर पेनकिलर खाल्ल्यावर जसा परिणाम होतो तसाच झाल्याचं बघायला मिळालं. त्यासोबतच निष्कर्षातून असंही समोर आलं की, ड्रग्स सेवन केल्यावर मेंदूच्या ज्या भागावर प्रभाव पडतो, त्याच भागावर याने प्रभाव पडतो. अभ्यासकांनी हेही सांगितलं की, जोडीदाराचा फोटो पाहिल्यावर या लोकांना वेदनेची जाणिव १२ टक्के कमी झाली. तेच कमी वेदनेची जाणिव ४५ टक्के कमी झाली.
अभ्यासकांनी हा विषय आणखी चांगला समजून घेण्यासाठी आणखीही दुसऱ्या अॅक्टिविटी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी यात सहभागी लोकांना काही गणितं सोडवण्यासाठी देऊन त्यांचं लक्ष दुर्लक्षित करुन वेदनेची जाणिव कमी करण्याचा प्रयत्न केला. या निष्कर्षातून असं आढळलं की, लक्ष हटवल्याने लोकांना वेदना तर कमी झाल्या पण याचा प्रभाव लोकांवर वेगळ्या पद्धतीने झाला.