ब्रेकअप तर केलं, आता पुढे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 13:30 IST2017-08-11T13:29:32+5:302017-08-11T13:30:10+5:30

जमत नाही किंवा पुढे जमणार नाही म्हणून एकतर्फी ब्रेकअपचा निर्णय घेताय?

break up? what next? | ब्रेकअप तर केलं, आता पुढे?

ब्रेकअप तर केलं, आता पुढे?

ठळक मुद्देब्रेकअप करुन नवीन नात्याचा विचार करताना आपण निर्णय कसे घेतोय हे देखील महत्वाचं आहेच.

-योगिता तोडकर 

संजनाचे तीन वर्षे एका मुलावर प्रेम होतं. दोघांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण तिने अनेकदा चर्चा, विनंती करूनही तो तिला अजिबात विशेष वेळ द्यायचा नाही. शेवटी कंटाळून तिने एकटीने त्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घरातल्यांशी चर्चा केली व घरातल्यांनी पाहिलेल्या मुलाशी साखरपुडा केला. तिच्या म्हणण्यानुसार आज ती नवीन मुलाबरोबर आनंदी आहे पण आधीच्या नात्याला  विसरू शकत नाहीये.

आता प्रश्न असा आहे, संजनाने घेतलेला निर्णय बरोबर आहे का? ती तो निभावू शकणार का? आणि कसा?

मुळात असे निर्णय चूक की बरोबर हे ठरवायला मिळणे कठीणच आणि  चूक असल्यास ते दुरुस्त करता येणं अवघड आणि आव्हानात्मकपण. तिच्याशी बोलताना जाणवतं की तिनं  घेतलेल्या  निर्णयामागे कुठेतरी नैराश्य होते.

निर्णय घेताना संजनाने तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या.

 एकतर ते नातं दोघांमध्ये असल्यामुळे तिने परस्पर एकटीने निर्णय घेणं योग्य नव्हतं. त्या मुलाशी चर्चा करून त्याला कल्पना द्यायला हवी होती की चालू परिस्थिती अशीच पुढे जात राहिली तर हे नातं निभावणं तिला अवघड होईल. त्याने त्याच्यामध्ये ते बदल आणण्यासाठी चर्चेनंतर तिने त्याला ठराविक वेळ द्यायला पाहिजे होता.

दुसरी गोष्ट आपल्या निर्णयामध्ये नेमकी कोणती जोखीम आहे हे तिने लक्षात घ्यायला पाहिजे होते. कारण तिच्या या एका निर्णयामध्ये तीन लोकांची आयुष्य गुंतलेली आहेत. ती नेमके काय करत आहे याबाबतीत तिच्या विचारांची सुस्पष्टता तिला हवी. 

तिसरी न सगळ्यात महत्वाची गोष्ट या निर्णयातली निश्चितता / अनिश्चितता  लक्षात घेणं. आज तिने साखरपुडा केल्यानंतर ती आधीच्या मुलाला विसरू शकत नाही, यामुळे ती स्वतर्‍ला दोष देत राहणार. मग ती मनाने शंभर टक्के ना आधीच्या मुलाबरोबर ना आत्ताच्या मुलाबरोबर. अशा परिस्थितीत ती नवीन नात्यात एकरूप होणार कशी ते नातं निभावून  नेणार कशी?

हे सगळे लक्षात न घेता, संजनाने जरी निर्णय घेतला असला तरी  तिच्यासमोर असणारा दुसरा उत्तम उपाय म्हणजे आयुष्यात आधी घडलेल्या गोष्टींमागं न धावता नवीन नात्याला पूर्णपणे सांभाळणे व स्वतर्‍ला सावरणं. कारण आधीचं नातं ती मागे सोडून आलीये व त्या आठवणींमध्ये नवीन नातं भरडून गेलं तर मोठं नैराश्यच पदरी पडेल. त्यामुळे आधीचं नातं सांभाळताना झालेल्या चुका अथवा मनाला त्रास देऊन गेलेल्या घडामोडी परत कशा घडणार नाहीत याची काळजी घेऊन येणारं नवीन आयुष्य प्रफुल्लित बनवणं. निर्णय घेताना यासार्‍याचा विचार करायला हवा.

( लेखिका समुपदेशक आहेत.)

Web Title: break up? what next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.