आई आहात? मग स्वत:ला मदर्स डेचं ‘हे’ गिफ्ट द्या!
By Admin | Updated: May 12, 2017 17:50 IST2017-05-12T17:41:55+5:302017-05-12T17:50:32+5:30
आईपणाचा जगायचं असेल तर आनंदाची ही भेट स्वतः ला द्या!

आई आहात? मग स्वत:ला मदर्स डेचं ‘हे’ गिफ्ट द्या!
- नेहा चढ्ढा
आई होण्यापूर्वीच्या आपण, आणि आजच्या आपण अशी तुलना केली तर काय दिसतं? जगभरातल्या तमाम आया एकच गोष्ट सांगतात, आई होण्यापूर्वी खाण्यापिण्याचं, भटकण्याचंच नाही तर निदान रात्री शांत झोपण्याचं आणि सुटीच्या दिवशीही काहीही न करता दुपारी मस्त झोप काढण्याचं स्वातंत्र्य होतं. आता ते नाही. एक क्षण फुरसत मिळत नाही. फटीग येतो, चिडचिड होते. रडू येतं अनेकदा. त्यात नोकरी करणारी आई असेल तर मग काय दिवसाचे २४ तास कमी पडतात. एकीकडे आपल्या आई असण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे आपल्याला आतून छळणारं औदासिन्य, त्याचं करायचं काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं एक चांगलं निमित्त आहे, रविवारी येणारा मदर्स डे. त्या दिनानिमित्त एक गिफ्ट द्या स्वत:ला आणि आपलं आईपण एन्जॉय करताना जरा रिलॅक्सही करा. आई असलो, तरी रिलॅक्स होणं यात काही चूक नाही.
तर मग करता काय येईल.
किमान या ५ गोष्टी रोज करा. आणि तुम्हाला स्वत:तच आनंदी बदल नक्की जाणवू लागतील.
१) पोटभर जेवा
आता यात काय नवीन सांगताय असं तुम्हाला वाटू शकतंच. पण बहुसंख्य आया पोटभर जेवतच नाहीत. मुलांच्या ताटात उरलेलं कसंबसं बकाबका खातात. नाहीतर अन्न उरु नये म्हणून स्वत:च्या पोटात ढकलतात. कामं पडलेली असतात म्हणून धावपळीत जेवतात. सगळ्यांना वाढली आणि स्वत:ला भाजी उरलीच नाही म्हणून लोणचं पोळी खातात. असं कशाला करायचं? आपणही पोटभर जेवावं. शिस्तीत वाढून घ्यावं. शांतपणे जेवावं. ते निदान १० मिनिटं तरी आपलेच. दुसरं महत्वाचं, जाहिरातींकडे दुर्लक्ष करा, त्या सांगतात म्हणून बारीक होवू नका. त्यापेक्षा चांगलंचुंगलं खा आणि चवीढवीचा स्वाद घ्या. उपासमार थांबवा स्वत:ची.
२) पाणी प्या
हे पुन्हा अत्यंत सामान्य. पण विचारा स्वत:ला तुम्ही पाणी पिताय का? किती पिता?
उत्तर नाही देता येणार? अनेक अभ्यास सांगतात की, बायका पाणीच पित नाहीत पुरेसं. डी-हायड्रेट असतात. त्यानं त्यांना थकवा येतो. चिडचिड होते. त्यामुळे आपण भरपूर पाणी पितोय ना, याकडे लक्ष द्या.
३) ३ मिनिटं उन्हात जा..
वेळच मिळत नाही हे कारण कितीही खरं असलं तरी त्याचा खरा अर्थ एवढाच की स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्यामुळे फक्त १० मिनिटं रोज सकाळी लवकर स्वत:साठी काढा, चालून या. जमल्यास ३ मिनिटं उन्हात उभ्या रहा. सूर्यप्रकाशात जा, व्हीटॅमिन डी मिळत नाही म्हणून कॅल्शिअम कमी म्हणून मग ऐन तिशीत अनेकींची हाडं दुखायला लागतात. ते टाळा.
४) झोपा किमान ६ तास
लहान मूल असलं की झोपेचा प्रश्न असतोच. पण तरीही प्रयत्नपूर्वक ६ तास झोप मिळायलाच हवी. ती ही गाढ. जमल्यास एखादी सिरीअल कमी पहा. व्हॉट्सअॅप झोपण्यापूर्वी बंद करा. आणि आपल्याला ६ तास गाढ झोप मिळेल असं पहा. कारण शांत झोप न मिळाल्यानंही मानसिक त्रास, चिडचिड यातह पित्त, पचनाचे विकार सुरु होतात.
५) एक दिवस आवडीचा
आठवड्यातून एकदा जे स्वत:ला आवडेल ते करा. स्वत:च्या आवडीचं एकच गाणं ऐकणं, ते स्वत:च्या आवडीची भाजी करणं, ते आवडीची साडी नेसणं किंवा काहीही जे स्वत:ला आवडेल ते करा. लोक मला गृहित धरतात अशी तक्रार करण्यापूर्वी स्वत:ला गृहित धरणं बंद करा. आणि स्वत:साठी, स्वत:वर प्रेम करत एखादी गोष्ट करा. त्यानं जो आत्मविश्वास मिळेल त्यानं मोठी मजल मारता येवू शकेल.