मुलांना भरमसाठ पॉकेटमनी देताय? - सावध, प्रश्न त्यांच्या निर्णयक्षमतेचा आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 17:29 IST2017-09-06T17:28:47+5:302017-09-06T17:29:36+5:30
जे आपल्याला मिळालं नाही, ते मुलांना द्यावं असं वाटण्यात गैर नाही, पण त्या पैशाचं मोल मुलांना समजतंय का?

मुलांना भरमसाठ पॉकेटमनी देताय? - सावध, प्रश्न त्यांच्या निर्णयक्षमतेचा आहे.
-योगिता तोडकर
परवा आम्ही काहीजणी भेटलो तेव्हा माझी एक मैत्रीण सांगत होती माझ्या मुलाचा महिन्याचा खर्च 20 हजार होतो. त्याचा अभ्यास व कॉलेजचं येणं जाण सोडून. अग त्याला सगळं ब्रँडेडच लागत. आणि दर महिन्याला काही हजाराचे ब्रॅण्डेड कपडे तो घेतो ते वेगळेच. दुसरी सांगत होती हो ना, या मुलांच्या खर्चावर ताबा कसा ठेवावा हेच कळत नाही. माझा मुलगा सकाळी आजोबांकडून पैसे घेतो, वडिलांकडून वेगळे न कधी माझ्याकडूनही. नंतर आम्हाला कळतं सगळ्यांकडून हुशारीने हा पठय़ा असे पैसे गोळा करतो. बर आम्ही दोघेही आपापल्या कामाच्या गडबडीत, मोठं चौकशी सत्र कधी करत बसणार?
खरं तर असं पालक सांगतात त्यात अनेकदा कौतूकही असतं. त्यांना वाटतं, माझ्या मुलाला ब्रॅण्ड कळतात. त्याच्या स्टायलिश गरजा भागतील अशी आपली आमदनीपण आहे. ते चांगल्याच हॉटेलमध्ये खातात, उत्तम लाइफस्टाईल आहे.
हे सारं कितीही खरं असलं तरी मुलांच्या हातात किती नि कसे पैसे येतात यावर त्यांची निर्णय क्षमता काम करायला सुरवात करते. आपण असा विचार करतो मला हे मिळालं नव्हतं, माझ्या मुलांना मिळालं पाहिजे, शेवटी कोणासाठी कमावतोय आपण? किंवा असंही वाटतं की माझी मुलं आहेत, त्यांना कसं कमी पडू द्यायचं काही?
पण पैसे हा असा एक घटक आहे जो तुम्हाला निर्णय कसे घ्यावेत, हे मोठ्या प्रमाणात शिकवतो. पैसे कसे कमवावेत, त्याचा वापर कसा करावा, गरजा कशा ठरवाव्यात, त्याचे मूल्य कसे ठरवावे, ते कमावण्याचे मार्ग कसे निवडावेत हे सारं पैसा शिकवतो. त्याचं मोल शिकवतो.
आपण जेंव्हा मुलांना सहज पैसे उपलब्ध करतो तेंव्हा कुठेतरी आपण त्यांची निर्णय क्षमता कमकुवत बनवत असतो. विशेषतर् मुलं 12-18 वयात असतात तेंव्हा या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देणं हे पालकांचं पहिलं कर्तव्य आहे.
तुम्ही जर बारकाईने लक्षात घेतलं तर जी मंडळी आयुष्यात यशस्वी झालेली दिसतात त्यांना त्यांच्या आयुष्यात पैशाचं मोल खूप आधी लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी नीट निर्णय घेतलेले दिसून येतात. ज्यांना सहज पैसा उपलब्ध होतो अशी मुले आयुष्यात मागे पडतात असं नाही पण ती ठराविकच उंची गाठू शकतात. कारण पैसे कुठे कसे गुंतवले जाऊ शकतात, त्याचा वापर योग्य होतोय का, हे सगळे निर्णय आधीच्या सवयींवर अवलंबून असतात. कारण ठराविक साच्यातून विचार करायची सवय लागून गेलेली असते.
पण मग करायचं काय तर मुलांना योग्य वेळेस पैशाचं मूल्य लक्षात आणून द्या. त्यांचे वॉचमन बनू नका. पण त्यांना त्यांच्या गरजा ओळखयाला शिकवा. त्यांना लागणारे पैसे देणारा घरात एकच माणूस असू द्या. आपण जे त्यांना सांगतोय त्याला अनुसरून स्वतर्चंही वर्तन ठेवा. थोडक्यात आपल्या मुलांच्या हातात पैसे देताना तो त्यांच्या निर्णय क्षमतेला आकार देतोय का याकडे लक्ष द्या.
( लेखिका समुपदेशक आहेत.)
yogita1883@gmail.com