स्वयंरोजगार कार्यालयाकडे युवतींची पाठच!
By Admin | Updated: January 4, 2015 01:04 IST2015-01-04T01:04:12+5:302015-01-04T01:04:25+5:30
अल्प प्रतिसाद : ४२ वर्षात केवळ ११०४१ जणींनी घेतला लाभ

स्वयंरोजगार कार्यालयाकडे युवतींची पाठच!
शोभना कांबळे / रत्नागिरी
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण ३३,८७७ बेरोजगारांनी नावनोंदणी केली. त्यापैकी २२८३६ युवक असून, केवळ ११,०४१ युवतींनी नावे नोंदविली आहेत. यावरून मुली स्वयंरोजगारासाठी नावनोंदणी करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
येथील जिल्हा सेवायोजन कार्यालयाची (आताचे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्र) निर्मिती १९६९ साली झाली. त्यानंतर १९९४ साली या कार्यालयाचे नामकरण ‘जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र’ असे झाले. मात्र, या ४३ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील युवकांची संख्या २२,८३६ इतकी असून, युवतींची संख्या निम्म्याने कमी म्हणजे ११,०४१ इतकी आहे. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागातील युवक - युवतींची संख्या अधिक आहे. एकूण संख्येपैकी १८,८२४ ग्रामीण युवकांनी तर ८,१३९ ग्रामीण युवतींनी या कार्यालयाकडे नोद केली आहे. म्हणजेच आतापर्यंत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये नावनोंदणीबाबत उदासीनता दिसून येत आहे. तसेच मुली आपल्या शहराबाहेर काम करण्यास इच्छुक नसल्याने त्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार केंद्राकडे स्वयंरोजगारासाठी दहावी ते विविध विषयातील पदव्युत्तर युवक - युवती रोजगार मिळावा, या हेतूने नाव नोंदणी करतात.
आतापर्यंत सर्वाधिक नोंदणी पदधीधरांनी केली आहे. त्याखालोखाल दहावी उत्तीर्ण झालेल्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, पदव्युत्तर झालेल्यांपैकी केवळ २९ जणांनीच कार्यालयाच्या नोंदणीचा लाभ घेतला आहे. या दोन्हींमध्ये विधी शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर झालेल्या एकाही उमेदवाराने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे स्वयंरोजगार केंद्राकडे नोंदणीबाबत अनेकांची अनुत्सुकता असल्याचे दिसून येते.