सहा ग्रामपंचायतींना दिले पिवळे कार्ड
By Admin | Updated: June 1, 2015 00:18 IST2015-05-31T22:31:59+5:302015-06-01T00:18:27+5:30
चिपळूण तालुका : १२४ ग्रामपंचायतीची विशेष दक्षता

सहा ग्रामपंचायतींना दिले पिवळे कार्ड
अडरे : चिपळूण तालुक्यात १३० ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या गावांचे मान्सूनपूर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात चिपळूण तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींना पिवळेकार्ड देण्यात आले तर १२४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड तर लाल कार्डाची एकही ग्रामपंचायत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या महिन्यात सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्व्हेक्षण घेण्यात आले. हे सर्व्हेक्षण आरोग्यसेवक व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक यांनी संयुक्तपणे केले. यात तालुक्यातील असलेले १ हजार २३९ स्त्रोत असून त्यामध्ये ६० स्त्रोत तात्पुरते बंद अवस्थेत आहेत. उर्वरित सर्व स्त्रोतांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये ६ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र शिरगाव अंतर्गत तळसर, शिरगाव, कोंडफणसवणे, कुंभार्ली, दादर अंतर्गत आकले, सावर्डे अंतर्गत टेरव या सहा ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले. १२४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड तर चिपळूण तालुक्यात एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड देण्यात आलेले नाही. पिवळे कार्ड म्हणजे मध्यम जोखीम, हिरवे सौम्य जोखीम व लाल कार्ड म्हणजे तीव्र जोखीम अशा प्रकारे स्त्रोतांचे सर्व्हेक्षण करुन शेरा दिला जातो. ज्या ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड देण्यात आले आहे. त्या ग्रामपंचायतींनी एका महिन्यात हिरव्या कार्डामध्ये रुपांतर करण्याच्या सूचना पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. पावसाळ््यात ग्रामीण भागातील पाणी शुध्द असावे, ग्रामपंचायतीनी यासाठी वेळीच पावले उचलावीत अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. (वार्ताहर)
मान्सूनपूर्व अहवाल
मान्सूनपूर्व तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या असून त्यादृष्टीने पहाणीही करण्यात आली. तालुका पंचायत समितीतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यादृष्टीने काळजी घेण्याचे व आता पिवळे कार्ड मिळाल्ल्या ग्रामपंचायतीला हिरव्या कार्डात रूपांतर करण्याबाबत योग्य पावले उचलण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. पावसाळ््यात साथ पसरू नये व वश्यक ती पावले उचलली जावीत या दृष्टीने सतर्कता दिसत आहे.