महागाईमुळे यावर्षी लाडका बाप्पाही महागला!
By Admin | Updated: July 16, 2017 18:23 IST2017-07-16T18:23:10+5:302017-07-16T18:23:10+5:30
गणेशमूर्तीशाळांमध्ये मात्र सध्या कामाची लगबग

महागाईमुळे यावर्षी लाडका बाप्पाही महागला!
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी , दि. १५ : वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा असते, त्या बाप्पांचे आगमन दि. २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. गणेशोत्सवाला जेमतेम महिना शिल्लक राहिला असला, तरी गणेशमूर्तीशाळांमध्ये मात्र सध्या कामाची लगबग सुरू आहे.
कोकणात घरोघरी गणेशमूर्ती आणून गणेशोत्सव साजरा केला जातो. बहुतांश मूर्तीकारांनी अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर माती भिजवून मूर्तीकामाचा शुभारंभ केला. कोकणात प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. ही शाडूची माती गुजरात राज्यातील भावनगर येथून मागवली जाते. भावनगरहून पेण येथे ही माती आयात केल्यानंतर महाराष्ट्रभर या मातीचे वितरण केले जाते. सध्या इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढला असल्याने शाडू मातीच्या दरातही वाढ झाली आहे.
गतवर्षी शाडू मातीचे पोते ३०० ते ३२५ रूपये दराने विकण्यात येत होते. यावर्षी त्याच पोत्याची विक्री ३५० ते ४०० रूपये दराने सुरू आहे.याच भिजवलेल्या मातीचा गोळा साच्यात ठेवून त्याला सुंदर गणेशमूर्तीचा आकार देण्यात येतो. मूर्तीवरील कोरीव काम, सुबक रंगकाम करण्यासाठी कुशल कारागिरांची आवश्यकता असते. कोकणातील ग्रामीण भागात सध्या कारागिरांची उणीव भासत आहे. शेतीची कामेही सुरू असल्याने मजूर नियमित येत नाहीत. मजुरी दरातील वाढ तसेच रंगाचे दरात झालेली वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या दरावर परिणाम होणार आहे.
गणपतीबाप्पा सर्वाचा लाडका देव असल्याने भक्त त्याला विविध रूपांमध्ये पाहणे पसंत करतो. मुंबईतला गणेशोत्सव सर्वांना भूरळ घालत असल्याने तेथील विविध आकारातील, रूपातील आकर्षक मूर्तीे फोटोच्या स्वरूपात किंवा व्हॉट्सअॅप, मोबाईलद्वारे फोटो पाठवून मूर्ती तयार करण्यास सांगण्यात येत आहे. इंटरनेटवरील सोशल साईटस्द्वारे कार्टुन्सपासून पौराणिक कथेतील अर्जुन, परशुराम, महादेव, बालगणेश, हनुमान तसेच जय मल्हार, बाहुबली या रुपातील गणेशमूर्ती तयार करण्यासाठी ग्राहक आग्रही असल्याचे दिसून येत आहे.
घरगुती गणेशमूर्ती सव्वा इंचापासून ते साडेतीन चार फुटापर्यंत तर सार्वजनिक गणेशमूर्ती या चार फुटापासून दहा ते बारा फूट उंचीच्या तयार केल्या जात आहेत. काही मूर्तीकारांनी शाडूची माती महाग पडत असल्याने लाल चिकण मातीचा वापर सुरू केला आहे. शाडू मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती वाळण्यास जास्त दिवस जात असल्यामुळे मूर्तीकार सध्या कामात व्यस्त आहेत.
लाल मातीची असो वा शाडूची मूर्ती ती पाण्यात लवकर विरघळते. या मातीपासून कोणतेही प्रदूषण होत नसल्याने त्यापासून गणपती तयार करण्यात येत आहेत. लाल मातीतील कठीण गुणधर्मामुळे मूर्ती चांगली बनत असल्यामुळे बहुतांश कारखानदारही लाल मातीचा वापर करू लागले आहेत.