चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

By संदीप बांद्रे | Published: February 14, 2024 12:41 PM2024-02-14T12:41:05+5:302024-02-14T12:42:11+5:30

संदीप बांद्रे चिपळूण (जि. रत्नागिरी ) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर ...

Work on flyover in Chiplun stalled for plan approval, Plan of new measures to the center | चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले, नव्या उपाययोजनांचा आराखडा केंद्राकडे

संदीप बांद्रे

चिपळूण (जि. रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर आणि तुटलेले गर्डर हटविण्यात आले. या घटनेनंतर उड्डाणपुलाचा आराखडा बदलून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यात दोन पिलरच्या मध्ये आणखी एक वाढीव पिलर उभारण्यात येणार आहे. मात्र, नवीन आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.

त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचविले होते. या बदलानुसार सध्या पूल उभारणीत ४० मीटरचे गाळे ठेवण्यात आले आहेत. त्यामधील अंतर २० मीटरवर ठेवून तेथे अतिरिक्त पिलर उभा करून गर्डर सिस्टिम करण्याचे सांगण्यात आले. तसा प्रस्ताव ईगल कंपनीकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे देण्यात आला आहे.

नव्या आराखड्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उड्डाणपुलाच्या पुढील कामास सुरुवात केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाचा प्रस्ताव दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नसल्याने पुलाचे काम ‘जैसे थे’ आहे.

नवीन आराखड्यानुसारच काम

कोकण मार्गावरच यापूर्वी ४० मीटरपेक्षा अधिक लांबीचे गाळे उभारून उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तिथे नियमित वाहतूकही सुरू आहे. त्या ठिकाणी अद्यापपर्यंत कोणत्याही अडचणी आलेल्या नाहीत. मात्र, चिपळुणातील उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर नवीन आराखडा तयार करण्यात आला. या नव्या आराखड्यानुसारच काम करण्याचे धाेरण ईगल कंपनीने स्वीकारले आहे.

  • लांबी १,८४० मीटर
  • रुंदी ४५ मीटर
  • एकूण ४६ पिलर

Web Title: Work on flyover in Chiplun stalled for plan approval, Plan of new measures to the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.