व्यवसायातून महिलांना उन्नतीचा मार्ग

By Admin | Updated: January 2, 2015 00:09 IST2015-01-01T22:34:03+5:302015-01-02T00:09:38+5:30

विकासाकडे झेप : दोन बचत गटांच्या एकोप्यातून शेती-भाजीपाला लागवडीचा प्रयोग

Women's Way of Advancement in Business | व्यवसायातून महिलांना उन्नतीचा मार्ग

व्यवसायातून महिलांना उन्नतीचा मार्ग

ग्रामीण भागातील महिलांनाही आता बचत गटाचे महत्व कळायला लागले आहे. अगदी डोंगराळ व दुर्गम भागातही शेती आणि फळलागवड करून अनेक महिला चांगल्या व्यवसायातून स्वावलंबी होत आहेत. मात्र, या महिलांना मार्गदर्शनाचीही तेवढीच गरज असते. योग्य मार्गदर्शन मिळाले तर या महिला चांगल्या तऱ्हेने आपला आर्थिक विकास करू शकतात, हे या महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीच्या काठावर वसलेले आंजणारी हे लहानसे गाव. मात्र, या महिलांमधील कष्टातून आर्थिक विकास करण्याची जिद्द महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनी प्रज्ञा पवार यांनी ओळखली. या छोट्याशा गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १० फेब्रुवारी रोजी माता रमाई आणि सावित्रीबाई फुले असे महिलांचे दोन बचत गट तयार करण्यात आले. या दोन्ही गटांच्या एकूण २० सदस्य आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही गटांचे सदस्य एकोप्याने राहतात. माता रमाई गटाच्या अध्यक्षा वनिता कांबळे दोन्ही गटाच्या कामकाजाकडे अगदी बारकाईने लक्ष देतात. दरमहा या बचत गटांची सभा घेणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे आदी जबाबदाऱ्या त्या स्वत: घेतात. या बचत गटाच्या सदस्या प्रत्येक महिन्याला ५० रूपये बचत करतात. मात्र, या बचतीतून आज त्यांचा विकास चढत्या आलेखाने होत आहे. येथील महिलांनी शेती करतानाच भाजीपाला लागवड करण्यास सुरूवात केली. या भाज्यांना परिसरातून चांगली मागणी आहे. त्यामुळे या भाज्यांची विक्रीही चांगल्या प्रमाणात होत आहे. आपल्या व्यवसायाचे स्वरूप वाढविण्यासाठी या महिलांना आर्थिक सहायाची गरज होती. या महिलांना बँकेने सहायाचा हात पुढे करून १ लाख रूपये मंजूर केले. प्रत्येक महिन्याला पाच हजार रूपये इतका हप्ता होता. मात्र, कष्ट करण्याची तयारी असलेल्या या महिलांनी नित्यनेमाने त्याची परतफेड अवघ्या ३ वर्षात केली. या दोन्ही गटांनी महिला सदस्यांसाठी अंतर्गत कर्जसुविधाही उपलब्ध करून दिली आहे. यातून महिलांना निव्वळ १० हजार रूपयांचा नफाही मिळतोे. या महिला अंतर्गत कर्जाचीही परतफेड नियमित करतात. त्यातूनच बचत गटाला उत्पन्न मिळत असते. या बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंंडळाचे सतत मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे त्यांना विविध योजनांची माहिती होण्यास मदत होते. या महिलांना सहयोगिनी प्रज्ञा पवार यांचे सहकार्य मिळत असते.
बचत गटाच्या एका महिला सदस्याने स्वत:चा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला असून, यातही चांगला नफा मिळत आहे. यासाठी या महिलेला लांजा येथील कृषी विज्ञान केंद्राचे मार्र्गदर्शन मिळाले. स्वत:चा व्यवसाय उभारण्याची मानसिकता आणि आत्मविश्वास आता या महिलांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या महिला आधुनिक शेती आणि भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागल्या आहेत. शेती व भाजीपाला चांगल्या व सोप्या पद्धतीने करता यावा, यासाठी आॅक्टोबर २०१३ मध्ये माता रमाई बचत गटातर्फे ट्रॅक्टर मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यासाठी लागणारी सर्व कागदपत्र पाली लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक उपेंद्र दळी व सहयोगिनी प्रज्ञा पवार यांनी मिळवून देण्यास सहकार्य केले. यासाठी गटातर्फे ३१००० एवढी रक्कम समाजकल्याण विभागाकडे जमा करण्यात आली होती. ही रक्कम महिलांनी आपल्या या व्यवसायातून केलेल्या बचतीतून उभी केली. त्याचे फळ म्हणून माता रमाई बचत गटाला समाजकल्याण विभागातर्फे ट्रॅक्टर देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेती व विविध फळभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करणे या महिलांना शक्य होणार आहे. नव्या वर्षात व्यवसाय वाढून बचत गटाला आर्थिक उन्नती साधता यावी, या उद्देशाने दोन्ही बचत गटांना वेगवेगळे व्यवसाय करायचे आहेत.
- शोभना कांबळे

Web Title: Women's Way of Advancement in Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.