'रेशन दुकानांसाठी आता महिला बचत गट सक्रिय

By Admin | Updated: February 6, 2015 00:43 IST2015-02-06T00:02:53+5:302015-02-06T00:43:49+5:30

रत्नागिरी जिल्हा : ३९ बचतगटांना नवीन दुकानांची मंजुरी

'Women Savings Group activated now for ration shops | 'रेशन दुकानांसाठी आता महिला बचत गट सक्रिय

'रेशन दुकानांसाठी आता महिला बचत गट सक्रिय

रत्नागिरी : महिला बचत गटांनी रेशन दुकाने चालविण्यास पुढे यावे, या उद्देशाने शासनाने नव्या धोरणानुसार महिला बचत गटांना प्राधान्य दिले असले, तरी याबाबत प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र, आता यासाठी महिला अनुकुलता दर्शवू लागल्या असून, जिल्ह्यातील ३९ महिला बचत गटांना नवीन दुकानांची मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात पूर्वी ८९४ दुकाने मंजूर होती, त्यात आता ३९ नवीन दुकानांची भर पडल्याने मंजूर दुकानांची संख्या ९३३ इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या कायमस्वरूपी १४४ दुकाने रिक्त त्यामुळे सध्या ७८९ दुकाने कार्यरत आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, म्हणून या रिक्त दुकानांपैकी ४३ दुकाने तात्पुरत्या व्यवस्थापनाखाली चालवायला दिलेली आहेत, तर उर्वरित १०१ दुकाने लगतच्या दुकानाला जोडलेली आहेत.
जिल्ह्यात १५३६ महसुली गावे आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महसूल गावात रेशन दुकान असणे आवश्यक आहे. त्यासाठी २००७ साली शासनाने महिला बचत गटांना नवीन दुकाने चालविण्यास द्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून नव्या दुकानांसाठी जाहीरनामे वारंवार काढण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्याला प्रमुख कारण म्हणजे येथील महिला बचत गटांचे अजूनही आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झाले नसल्याने दुकान चालविण्याबाबत त्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे या दुकानांसाठी महिला बचत गट पुढे आले नाहीत. त्यामुळे शासनाने निर्णय बदलून समाजातील इतर घटकांना दुकाने चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला.
त्यातच शासनस्तर असणाऱ्या त्रुटी यांना तोंड देणे फार कठीण आहे. नैसर्गिक त्रुटी आणि घटीच्या बाबी शासन मानायला तयार नसल्याने आहे त्यापैकी काहींनी दुकाने बंद करून दुसरे व्यवसाय सुरू केले. याचा परिणाम नवीन दुकानांवरही झाला असून, ती चालवण्यासही पुढे येत नाहीत. सध्या ही रिक्त दुकाने शासनाने तात्पुरत्या व्यवस्थापनावर चालवण्यास दिली असली तरीही या तात्पुरत्या चालवणाऱ्यांना कायमस्वरूपी दुकानांप्रमाणे कोणतेच लाभ मिळत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे ही दुकाने सांभाळणाऱ्या या व्यवस्थापनाला कायमस्वरूपी करण्याची मागणीही रास्त दर धान्य दुकान चालक - मालक संघटनेकडून गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे. शासन मूग गिळूनच राहिले आहे. त्यामुळे या दुकानदारांमध्येही नाराजी आहे. (प्रतिनिधी)

दापोली (४)असोंड, वडवली, कोंगळे, सातांबा.
खेड (१०)तांबड - मिर्ले, होडखाड, उधळे खुर्द, दाभिळ,
नीळीक, भिलारे आयनी, गुणदे गणवाल,
वाळंजगाव, वेताळवाडी, तिसे खुर्द
गुहागर (३)मुसलोंडी, भातगाव धक्का, खामशेत
चिपळूण (२)वैजी, पाचाड
संगमेश्वर (११)तळवडे तर्फ देवरूख, मेढेतर्फ फुणगूस, दाभोळे खुर्द,
कुटगिरी, पूर, बोंड्ये, भीमनगर, निवळी, शिवणे, अणदेरी, पाटगाव.
रत्नागिरी (३)कापडगाव, चिंचखरी, नागलेवाडी.
लांजा (२) देवधेतर्फ बौद्धवाडी, नांदिवली
राजापूर (१)पळसमकरवाडी.

Web Title: 'Women Savings Group activated now for ration shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.