एच्आय्व्ही चाचण्यांबाबत महिलांमधील जागृती वाढतेय..!
By Admin | Updated: June 25, 2014 00:49 IST2014-06-25T00:46:59+5:302014-06-25T00:49:28+5:30
१२ वर्षात जिल्ह्यातील १,८३,९७१ नागरिकांनी चाचण्या करून घेतल्या

एच्आय्व्ही चाचण्यांबाबत महिलांमधील जागृती वाढतेय..!
रत्नागिरी : आरोग्य विभाग, सेवाभावी संस्था तसेच प्रसार माध्यमांमुळे समाजात आता एड्सबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली असून, महिलांमध्येही सजगता निर्माण झाली आहे. येथील एकात्मिक समुपदेशन आणि तपासणी केंद्राचा (आय. सी. टी. सी.) आधार घेऊन गेल्या १२ वर्षात जिल्ह्यातील एकूण १,८३,९७१ नागरिकांनी या चाचण्या करून घेतल्या. विशेष म्हणजे यात ८९,६३१ इतकी महिलाची संख्या आहे. तर होणाऱ्या बाळाच्या काळजीपोटी १,०२,५३८ गरोदर मातांनी या तपासण्या स्वेच्छेने करून घेतल्या.
एड्स रोगाबाबत समाजात अजुनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अगदी पुरूषवर्गही या चाचण्या करू घेण्यास तयार होत नाही. महिला वर्ग तर एकंदरीत आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच करत असतात. त्यामुळे या चाचण्या करून घेण्याबाबतही त्यांच्यात एक प्रकारची भीती असायची. मात्र, आता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षांतर्गत (ऊ्र२३१्रू३ अ्र२ि ढ१ी५ील्ल३्रङ्मल्ल उङ्मल्ल३१ङ्म’ वल्ल्र३ - ऊअढउव) सुरू असलेले समुपदेशन केंद्र तसेच विविध सामाजिक संस्थांचे जनजागृतीत असलेले योगदान यामुळे पुरूष आणि महिलाही या केंद्राच्या चाचण्या करून घेण्यास अनुकुलता दाखवू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्हा रूग्णालयाचे दोन आयसीटीसी विभाग, उप जिल्हा रूग्णालये, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये आणि ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळून मे २००२ ते मार्च २०१४ पर्यंत ९४,३४० पुरूष आणि ८९,६३१ स्त्रियांनी या चाचण्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे एच. आय. व्ही. बाधितांची २००२ साली असलेली ३३.६३ इतक्या टक्केवारीत घट होवून ती आता ३.०३ वर आली आहे.
रत्नागिरीतील जिल्हा रूग्णालयात आयसीअीसी या केंद्राची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे २००२ साली केवळ २८ महिलांनी तर २००३ साली १०० महिलांनी तपासणी करून घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाने इतर सामाजिक घटकांच्या सहकार्याने समाजात केलेल्या पोस्टर्स, व्याख्याने, स्लाईडस शो, पथनाट्य आदी उपक्रमाने लोकांच्या मनातील भीती हळूहळू कमी होवू लागली. त्यामुळे आता चाचण्या करून घेण्यास पुरूषांबरोबरच महिला वर्गाची संख्या वाढली आहे.
माता - पिता एच. आय. व्ही बाधित असले तरी जन्मास येणारे बालक येथील उपचाराने निरोगी होऊ शकते, ही बाब समुपदेशनाद्वारे महिलांपर्यंत किंवा एकंदरीत समाजापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळेच आता येणारे बाळ निरोगी यावे, या विचाराने जिल्ह्यातील गरोदर माता या चाचण्या करण्यास तयार होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)