जुने-नवे संघर्ष रंगणार?
By Admin | Updated: October 21, 2014 23:45 IST2014-10-21T22:13:05+5:302014-10-21T23:45:30+5:30
रत्नागिरी मतदारसंघ : शिवसेनेत पदांवरून साठमारी सुरू!

जुने-नवे संघर्ष रंगणार?
रत्नागिरी : आमचा जुन्या शिवसैनिकांना कोणताही उपद्रव होणार नाही, असे राष्ट्रवादीतून कार्यकर्त्यांसह सेनेत पक्षांतर करणाऱ्यांनी सांगितले असले तरी पक्षातील पदांवरून जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच धूसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील जुन्या-नव्यांमधील संघर्ष रंगण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला स्वीकारले, परंतु आपली पदे नव्यांना हिसकावू द्यायची नाहीत, यासाठी ‘जुन्यां’कडून रणनीती आखली जात आहे. तर पदांचीच सवय झालेल्या नव्यांना पदांशिवाय राहण्याची सवय नसल्याने पदांसाठी ‘आगे बढो’ असे सूत्र अवलंबिले जात आहे. त्यामुळेच हा संघर्ष वाढण्याची चिन्हे ठळक झाली आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी विधानसभेची जागा ही सेना-भाजपाची युती असल्याने भाजपाच्या वाट्याला आली होती. २००४ पासून सतत तीनवेळा भाजपा उमेदवार बाळ माने यांना कोणामुळे पराभव पत्करावा लागला, याचाही उलगडा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून झाला आहे. सेनेतीलच ‘राजकीय शाखेची’ हाराकिरी हा विषय त्यातून अधोरेखित झाला. त्यामुळे नव्यांच्या आगमनाने जुन्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे.
दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यास रत्नागिरीतून प्रथम मिळणारी विधानसभेची उमेदवारी देण्यावरून जुन्यांमध्ये असंतोषाची पहिली ठिणगी उडाली होती. यावरून आठवडाबाजारमधील कार्यालयात झालेल्या पहिल्याच सभेत खडाजंगीही झाली होती. गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी मतदारसंघ सेनेला मिळावा ही कार्यकर्त्यांची मागणी होती. यावेळी युती तुटल्याने ही संधी शिवसैनिकांना चालून आली होती. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकही येथून जिंकायचेच या जिद्दीने कामालाही लागले होते. तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी तालुक्यात अतिशय नेटकेपणे संघटना बांधणीचे काम केले होते. त्यांना उमेदवारी जवळ-जवळ निश्चित झाली होती. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र आयत्यावेळी वायुवेगाने घडामोडी झाल्या अन आपला उमेदवार निवडून आणण्याची कार्यकर्त्यांची उमेदच निघून गेली. नेत्यांचा असंतोष थंडावला तरी कार्यकर्त्यांतील असंतोषाची धग अद्यापही कायम आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणारी उमेदवारी तर गेलीच परंतु पक्षात आलेल्या नव्यांकडून आता संघटनेतील पदांसाठी साठमारी सुरू होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निरलस भावनेतून पक्षाचे कार्य करणारे कार्यकर्ते आता कमी आहेत, ही वस्तूूस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळेच दुसऱ्या पक्षातून आलेले पदाधिकारी हे केवळ कार्यकर्ता बनून राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे. इथुनच जुुने-नवे वादाची सुरुवात होते.
विधानसभेची निवडणूक आता झालीय म्हणजेच कोंढाण्याचे लग्न झालेय, आता पक्षात आलेल्या नव्या सुभेदारांसाठी पक्षाच्या कोणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांना आपल्या पदांचे गड खालसा करावे लागणार हा खरा प्रश्न आहे. निष्ठावंताच्या उमेदवारीचा बळी आधीच गेलाय आता जुन्यांची कोणती व किती पदे पणाला लागणार, हाच कळीचा मुद्दा बनला आहे. असंतोषाची ही धग वाढती असून त्यामुळे जुने-नवे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
असंतोषाची धग थांबणार कशी?
आपली पदे हिसकावू द्यायची नाहीत यासाठी जुन्या कार्यकर्त्याकडून रणनीतीची आखणी.
नव्या कार्यकर्त्यांनाही हवी संघटनेतील गडांची सुभेदारी.
प्रथमच मिळालेल्या उमेदवारीचा बळी गेलाच आता पदे पणाला न लावण्याचा जुन्यांचा निर्धार.
नेत्यांचा असंतोष थंडावला असला तरी कार्यकर्त्यांमधील असंतोषाची धग अद्यापही कायम.
पक्षप्रमुखांच्या आदेशाला दिला शिवसैनिकांनी मान.