कौटुंबीक भांडणातून पत्नीने घेतले स्वतःला पेटवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:54+5:302021-03-24T04:29:54+5:30
खेड : तालुक्यातील कुळवंडी - देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून ...

कौटुंबीक भांडणातून पत्नीने घेतले स्वतःला पेटवून
खेड : तालुक्यातील कुळवंडी - देऊळवाडी येथे नवरा बायकोचे भांडण विकोपाला जाऊन बायकोने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आणि घराबाहेर काही अंतरावर उभ्या असलेल्या नवऱ्याला पेटत्या अवस्थेत मिठी मारली. या घटनेत गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, पतीवर उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवार दि. २२ रोजी मध्यरात्री घडली. शिल्पा मंगेश कदम (४०) असे या महिलेचे नाव असून, तिचा नवरा मंगेश बाळाराम निकम हा गंभीररीत्या भाजला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुळवंडी देऊळवाडी येथे सोमवार दि. २२ रोजी मध्यरात्री ९९ टक्के भाजलेल्या शिल्पा निकम यांचा अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर तिचा पती मंगेश ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाला आहे. त्याला खेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. या प्रकारामुळे कुळवंडीसह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नवरा-बायकोचे भांडण इतक्या विकोपाला का आणि कशासाठी गेले? पत्नीनेच स्वतःला पेटवून घेत आपल्या नवऱ्याला मिठी का मारली? दोघांमध्ये नेमके काय घडले होते याचा तपास खेड पोलीस घेत आहेत.