जलशुध्दिकरण केंद्र कधी होणार ?

By Admin | Updated: January 15, 2015 23:31 IST2015-01-15T21:58:23+5:302015-01-15T23:31:23+5:30

पाजपंढरी ग्रामस्थांचा टाहो : पावसाळ्यात होणारी पायपीट थांबवावी

When will the water purification center? | जलशुध्दिकरण केंद्र कधी होणार ?

जलशुध्दिकरण केंद्र कधी होणार ?

आंजर्ले : पावसाला सुरूवात झाल्यावर पाणीटंचाई दूर होते. मात्र, पाजपंढरी गावात पाणीटंचाई सुरू होते. बांधतिवरे नळपाणी योजनेत जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून ही योजना पावसाळ्यात बंद ठेवली जाते. यंदा तरी हे जलशुध्दिकरण केंद्र मंजूर करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.हर्णै - पाजपंढरी गावासाठी १९९६ साली बांधतिवरे नळपाणी योजना मंजूर करण्यात आली. १९९६ला मंजूर झालेली ही योजना अनेकविध कारणानी रखडत राहिली. ही योजना २००८ साली पूर्ण झाली. या कालावधीत हर्णै-पाजपंढरीवासीयांना मार्च ते मे महिन्यात पाणी विकत घ्यावे लागत होते. ५० रूपये बॅरल या दराने या तीन महिन्यात लाखो रूपयांची पाणी विक्री व्हायची. २००८ साली बांधतिवरे नळपाणी योजना पूर्ण होऊन कार्यान्वीत झाल्यानंतर हर्णै व पाजपंढरीवासी आनंदी झाले. मात्र, त्यांचा आनंद जास्त दिवस टिकला नाही. कारण नळपाणी योजना मंजूर करताना या योजनेत जलशुध्दिकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नव्हता. मुळात शुध्द पाणीपुरवठा होणे, हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बहुसंख्य आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. मात्र, ही योजना मंजूर करताना जलशुध्दिकरण केंद्राचा त्यात समावेश न केल्याने नागरिकांच्या आरोग्याशी आम्हाला काही देणे घेणे नाही हेच सिध्द केले आहे. आता जलशुध्दिकरण केंद्राअभावी पावसाळ्यात ही योजना बंद ठेवावी लागते. कारण ही योजना ज्या नदीवर आहे, त्या नदीला दापोली शहरातून वाहणारी जोग नदी मिळते. दापोली शहरातील कचरा, सांडपाणी या जोग नदीतच टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात या नदीचे पाणी दूषित होते. टीसीएल पावडर टाकून १०० टक्के पाणी शुध्द करता येत नाही. पर्यायाने ही योजना बंद ठेवावी लागते. मासिक २०० रूपये पाणीपट्टी भरूनही भर पावसाळ्यात पाणीपुरवठा बंद केला जातो.हर्णै व अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. मात्र, पावसाळ्यात धो-धो पाऊस कोसळणाऱ्या कोकणात पाजपंढरीवासीयांना विकतचे पाणी प्यावे लागते, तर काहींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे उलटे चित्र राज्यातील एकमेव उदाहरण असावे. या स्थितीची दखल घेऊन शासनाने तातडीने बांधतिवरे नळपाणी योजनेसाठी जलशुध्दीकरण केेंद्र मंजूर करावे व पावसाळ्यात पाण्यासाठी होणारी पाजपंढरीवासीयांची परवड थांबवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

भर पावसातही सुरू राहते दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे तीव्र पाणी टंचाई.
पाजपंढरी येथे भरपावसात निर्माण होणाऱ्या टंचाईवर कायमचा उपाय करण्याची मागणी.
जलशुध्दिकरण केंद्र नसल्याने प्रदूषित पाण्याचा प्रश्न कायम ऐरणीवर.
हर्णै - अडखळ गावाला पर्यायी नळपाणी योजना असल्याने पाणीटंचाई नाही.

Web Title: When will the water purification center?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.