पर्यटन विकास साधण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक : डाॅ. बी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST2021-09-22T04:34:46+5:302021-09-22T04:34:46+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात अधिक विकास साधण्यासाठी शासन, प्रशासनासोबत लोकसहभाग यांनी एकत्रित येऊन एकमेकांमध्ये समन्वय साधून ...

पर्यटन विकास साधण्यासाठी एकत्रित काम करणे आवश्यक : डाॅ. बी. एन. पाटील
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात अधिक विकास साधण्यासाठी शासन, प्रशासनासोबत लोकसहभाग यांनी एकत्रित येऊन एकमेकांमध्ये समन्वय साधून काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे सोमवारी आयोजित जिल्हा पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये तसेच संबधित अधिकारी तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातूनही जिल्हयातील पर्यटन क्षेत्राशी संबधित व्यक्ती, संस्थेचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा पर्यटन आराखडा संदर्भात प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच संस्थेंच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पर्यटन क्षेत्रात काम करीत असताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रात विकसीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे गरजेच आहे. प्रत्येकांनी पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या भागातील क्षेत्राचा ॲक्शन प्लॅन तयार करुन आवश्यकता (रिक्वायरमेंट) सादर कराव्यात, जेणेकरुन पर्यटन आराखडा तयार करताना त्याचा सहभाग घेऊन तो कृतीत आणता येईल. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांशी चर्चा करताना ते म्हणाले की परवानगीसंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आपल्याला लवकरात लवकर पर्यटनांशी संलग्न परवानग्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन अधिक विकसीत करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.
जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये यांनी पर्यटनासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.
............
फोटो मजकूर
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी जिल्हा पर्यटन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळ्ये तसेच संबधित अधिकारी तसेच पर्यटनक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या.