प्रवासी शेड तोडून दुकानात जाण्याचा रस्ता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:38 IST2021-09-16T04:38:48+5:302021-09-16T04:38:48+5:30
देवरुख : देवरुख-संगमेश्वर या राज्य मार्गावर सह्याद्रीनगर साडवली येथे अनेक वर्षांपासून प्रवासी शेड बांधण्यात आली आहे. तिचा वापरही प्रवाशांकडून ...

प्रवासी शेड तोडून दुकानात जाण्याचा रस्ता?
देवरुख : देवरुख-संगमेश्वर या राज्य मार्गावर सह्याद्रीनगर साडवली येथे अनेक वर्षांपासून प्रवासी शेड बांधण्यात आली आहे. तिचा वापरही प्रवाशांकडून चांगल्या प्रकारे होत होता. मात्र काही दिवसांपूर्वी या शेडची अज्ञात व्यक्तीने मोडतोड केली आहे आणि त्याकडे संबंधित यंत्रणा डोळेझाक करत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
ही प्रवासी निवारा शेड तशी मध्यवस्तीत असल्याने अनेक कंपन्या, शाळा, महाविद्यालये व शासकीय कर्मचारी, शिक्षक याचा वापर करीत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने आपल्या दुकानाकडे जाण्यासाठी चक्क शेडमधील प्रवाशांची बैठक तोडून रस्ताच तयार केला आहे. त्याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायत साडवली, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरुख, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना फोटोसह तक्रारअर्ज सादर करण्यात आले. परंतु सर्वांनीच अज्ञात व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्वच विभागांनी जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले असल्याने माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागविण्यात आली. त्यानंतर साडवली ग्रामपंचायतीने गणेशोत्सवापूर्वी पूर्ण शेड बांधण्यात येईल, असे तोंडी आश्वासन दिले होते. माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहितीही अपूर्ण देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करण्यात आल्याने थातूरमातूर काम करण्यात आले आहे. अर्थात त्यातूनही मागील बाजूला दुकानात जाण्यासाठी शेडमधूनच रस्ता करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना प्रवासी शेडबाबत झालेल्या सर्व मोडतोडीचे फोटो व माहिती देऊन कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र समविचारी मंचाचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी दिली.
140921\495720210914_160820.jpg
सह्याद्रीनगर येथील ही प्रवाशी निवारा शेड