पाणीटंचाईचा अध्याय यंदाही
By Admin | Updated: October 21, 2014 23:39 IST2014-10-21T21:39:47+5:302014-10-21T23:39:14+5:30
राजापूर तालुका : अर्जुना नदी महिनाभरातच कोरडी

पाणीटंचाईचा अध्याय यंदाही
पाचल : परिसरातील कित्येक गावांसाठी तारणहार ठरलेली अर्जुना नदी गाळामुळे श्वास कोंडल्याने आॅक्टोबर महिन्याच्या सरतेशेवटीच कोरडीठण्ण पडू लागली आहे. सध्या या नदीच्या पात्रात किरकोळ पाणीसाठा उरला असून थोड्याच दिवसात तोही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभोवतालच्या गावांना यंदाही पाणीटंचाई जाणवणार आहे.
राजापूर तालुक्यातील कित्येक गावांसाठी अर्जुना नदी ही तारणहार ठरली आहे. राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील डोंगराळ भागात उगम पावलेल्या अर्जुना नदीचे पात्र जवळपास ९० टक्के गाळाने भरले आहे. या पात्रात पूर्वीइतका पाणीसाठा होण्यासाठी जागाच शिल्लक नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा तोकडा अभ्यास, वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयाची उदासिनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमध्ये अडकलेली ही नदी भविष्यात या गावांसाठी खरोखरच तारणहार ठरु शकते का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
सामान्य जनतेच्या हितासाठी दळण-वळणाचे साधन म्हणून निर्माण झालेले कॉजवे गाळ साठण्याला सर्वात मोठे कारण ठरत आहे. अर्जुना नदीचा उगम तीव्र चढावावर असून पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे कित्येक पाणी वाहुन जाते. हे वाहुन जाणारे पाणी व बांधण्यात आलेल्या कॉजवेचे पाईप याचे समिकरण जुळत नसल्याने मोठ्या गतीने पळणाऱ्या पाण्याला कॉजवेमुळे अचानक लगाम लागतो व कॉजवेच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साठतो.
टंचाईच्या काळात लाखो रुपये खर्च करुन या परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी पुरवले तरी महिलांना दूरच्या गावात जाऊन पाणी आणावे लागते. त्यासाठी सक्षम पर्याय म्हणून या नदीतील गाळ काढणे आवश्यक आहे. मात्र त्याबाबत प्रशासन उदासिन असल्यामुळे वर्षानुवर्षाचा गाळ या नदीच्या पात्रात साठत आहे. त्यामुळे श्वास कोंडलेल्या नदीचा या परिसरातील गावांना उपयोगच होईनासा झाला आहे. (वार्ताहर)