विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:35 IST2019-07-27T12:33:10+5:302019-07-27T12:35:17+5:30
विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.

विधानसभा निवडणूक- इनकमिंगवरील श्रद्धेमुळे सर्वच पक्षांची सबुरी
रत्नागिरी : विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असल्या तरी उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांमध्ये अजून शांतताच आहे. या निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे अपेक्षित आहेत. या पक्षांतरावर श्रद्धा असल्याने उमेदवार निवडीबाबत राजकीय पक्षांनी सबुरी ठेवली आहे. या पक्षांतरांमुळे काही पक्षांचे उमेदवार बदलणार आहेत आणि काही उमेदवारांचे पक्ष बदलणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या पाचही विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षांतराच्या जोरदार हालचाली आहेत. काँग्रेस आघाडीमध्ये राजापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. तेथे राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव इच्छुक आहेत. त्यामुळे अजित यशवंतराव यांना काँग्रेसमध्ये घ्यावे, अशी मागणी काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतील एका बैठकीत केली आहे.
याखेरीज राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्याबाबतही पक्षांतराच्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. भास्कर जाधव हे शिवसेनेत, तर संजय कदम भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या दोन्ही आमदारांनी अजून त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
अनेक नेत्यांच्या पक्षांतराबाबतची बोलणी सुरू असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीबाबत अजून कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. प्रत्येक मतदारसंघात अशा घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रचार नेमका कोणाचा करायचा, याबाबत कार्यकर्तेही अजून संभ्रमातच आहेत.
पक्षांतराची चर्चा
शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता कमी असल्याने जर-तरच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिक रंगत आली आहे. युती झाली तरी मतदारसंघ वाटपात काय होणार आणि त्याचे उमेदवार निवडीवर काय परिणाम होणार, याच्या चर्चाही जोर धरत आहेत. इच्छुकांनी मात्र मतदार संघात दौरे वाढवले असून, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावू लागले आहेत.
युती स्वबळ आजमावेल
शिवसेना आणि भाजपमध्ये दाखल झालेल्या अन्य पक्षातील लोकांची संख्या आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावयाची उमेदवारी यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा आहे. स्वबळाच्या लढाईत अजूनही अनेक पक्षांतरे होणे अपेक्षित आहे. त्यासाठीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे विधानसभेची तयारी कोणीच सुरू केलेली नाही.