VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
By अरुण आडिवरेकर | Updated: April 29, 2025 23:51 IST2025-04-29T23:48:23+5:302025-04-29T23:51:23+5:30
सुदैवाने गस्त घालणाऱ्या पाेलिसांनी तातडीने बचावकार्य केल्यामुळे सारे बचावले

VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: खाडीत हाेणारी मासेमारी पाहण्यासाठी हाेडीने खाडीत गेलेल्या तरुणांची हाेडी बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी रत्नागिरीतील फिनाेलेक्स जेटीजवळ घडली. सुदैवाने या ठिकाणी गस्त घालणाऱ्या पाेलिसांच्या ही गाेष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने बचावकार्य करत हाेडीतील १६ जणांना वाचविले. त्यामुळे माेठा अनर्थ टळला. या सर्वांवर प्रथमाेपचार करुन त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
तालुक्यातील पावस येथे परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही स्थानिक ग्रामस्थ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावस खारवीवाडा येथील ‘सरस्वती’ नावाची होडी घेऊन रनपार खाडीत फिरण्यासाठी गेले हाेते. या सर्वांना खाडीतील मासेमारी पाहायची हाेती. ही हाेडी फिनाेलेक्स जेटीसमाेर आली असता अचानक बुडू लागली़, त्याचवेळी पूर्णगड सागरी पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये सागरी कवच अभियानांतर्गत गस्त सुरू हाेती. पाहा व्हिडीओ-
#VIDEO : रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश#Ratnagiripic.twitter.com/XLZtgdQOTc
— Lokmat (@lokmat) April 29, 2025
या गस्तीदरम्यान खाडीत हाेडी बुडत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटींच्या साहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या १६ जणांना वाचवले. या सर्वांना सुखरूपपणे किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत होडी पाण्यात बुडाली.