लसीकरण, योगामुळे ‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:19+5:302021-05-23T04:31:19+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांचे तातडीने झालेले लसीकरण यामुळे त्यांची ...

Vaccination, yoga boosted the khaki's immune system | लसीकरण, योगामुळे ‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली

लसीकरण, योगामुळे ‘खाकी’ची रोगप्रतिकारशक्ती वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग अधिक असला तरीही पोलिसांचे तातडीने झालेले लसीकरण यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पोलीस दलातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर योगा, प्राणायाम हेही केले जात असल्याने पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पोलीस कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा कमी झाले आहे.

पहिल्या लाटेत १९ पोलीस अधिकारी आणि १९७ कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेपूर्वीच पोलिसांचे लसीकरण सुरू झाले. पहिला डोस ९६ टक्के तर दुसरा डोस ९० टक्के पोलिसांना देण्यात आल्याने बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दुसऱ्या लाटेत २ अधिकारी आणि ६२ कर्मचारी बाधित झाले असले तरीही त्यांच्यापैकी बहुतांश जणांना सौम्य लक्षणे होती.

विशेष दक्षता...

कोरोनाच्या काळात पोलीस कोरोनामुक्त रहावेत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग दक्ष आहेत. सध्या पोलिसांचे मनोबल व आत्मविश्वास वाढविण्यासाठी योगा, प्राणायाम करून घेतले जात आहे. दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून पोलिसांना आर्सेनिक गोळ्या, वाफेचे मशीन, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर तसेच ऑक्सिमीटर, थर्मामीटर दिले आहे.

कोरोना काळात पोलीस दल अहोरात्र काम करीत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक पोलीस कर्मचारी बाधित झाले होते. मात्र, आता आम्ही दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम करतो. मी स्वत: गरम पाणी, काढा पितो. स्वत:ची व घरातील लोकांची विशेष काळजी घेतो. त्यामुळेच आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित रहात आले.

- महेश कुबडे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल, रत्नागिरी

पहिल्या लाटेवेळी थेट नागरिकांच्या संपर्कात येऊन काम करत होतो. त्यामुळे अनेक कर्मचारी बाधित झाले होते. आता कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम गोळ्या दिल्या आहेत. त्या रोज घेते व सी व डी व्हिटॅमिन स्प्रेचा वापर करते. सकाळी व संध्याकाळी गरम पाणी पिते व घरच्यांनाही देते. बाहेरून आले की घरातल्यांपासून लांब राहते.

- श्रीया साळवी, पोलीस नाईक, रत्नागिरी

दुसऱ्या लाटेत खबरदारी म्हणून शासनाने पोलिसांच्या लसीकरणावर भर दिला. त्यामुळेच आता जवळपास १०० टक्के लसीकरण होत आले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ‘सहेत संवाद’ सारख्या उपक्रमामुळेही कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले.

- डाॅ. मोहितकुमार गर्ग,

जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी

Web Title: Vaccination, yoga boosted the khaki's immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.