शासनाच्या सूचनांप्रमाणेच लसीकरण सुरू : निखिल परांजपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:38+5:302021-08-24T04:35:38+5:30

राजापूर : उपलब्ध होणारा लसीचा साठा आणि लसीकरणाबाबत शासनाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे तालुक्यातील धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व प्राथमिक आरोग्य ...

Vaccination started as per government instructions: Nikhil Paranjape | शासनाच्या सूचनांप्रमाणेच लसीकरण सुरू : निखिल परांजपे

शासनाच्या सूचनांप्रमाणेच लसीकरण सुरू : निखिल परांजपे

राजापूर : उपलब्ध होणारा लसीचा साठा आणि लसीकरणाबाबत शासनाच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे तालुक्यातील धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रूग्णालयात लसीकरण सुरू आहे. ज्यांचा पहिला डोस घेऊन जास्त कालावधी उलटला आहे, अशांना प्राधान्याने दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे जनतेने लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा वा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सव सणात होणारी गर्दी आणि तिसऱ्या लाटेचा धोका या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने सुयोग्य असे नियोजन करून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचेही डॉ. परांजपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत तालुक्यात कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. गेली चार वर्षे धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करणारे डॉ. परांजपे हे सध्या तालुका आरोग्य अधिकारीपदाचा प्रभारी पदभार सांभाळत आहेत. कोरोना काळात अत्यंत सुयोग्य असे नियोजन करून त्यांनी तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राजापूर तालुक्यात शासनाच्या नियमाप्रमाणे व निर्देशाप्रमाणे लसीकरण सुरू आहे. दोन ग्रामीण रूग्णालयांसह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यातील सर्व उपकेंद्रांमध्ये हे लसीकरण केले जात आहे. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होते त्याप्रमाणे त्याचे नियोजन करून लसीकरण केले जात आहे. सध्या दुसऱ्या डोससाठी प्राधान्य दिले जात असून, पहिला डोस घेऊन जास्त दिवस झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचे नियोजन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत जनजागृती होत असून, लोक मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी पुढे येत आहेत. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसींप्रमाणे नियोजन करून हे लसीकरण केले जात असून, भविष्यात तालुक्याला जास्तीत जास्त लस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पहिला आणि दुसरा अशा दोन्ही डोसचे १०० टक्के लसीकरण करण्याचा निर्धार आरोग्य विभागाचा असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

Web Title: Vaccination started as per government instructions: Nikhil Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.