राजापूर : कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच दुसरीकडे तालुक्यातील पूर्व परिसरात मोबाईल सेवेतील व्यत्ययाचाही उद्रेक सातत्याने होत आहे. जामदा परिसरात जवळेथर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, त्या परिसरात इंटरनेट सेवा नसल्याने त्या केंद्रावर कोविड लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. तालुक्यातील याच एकमेव आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू नसल्याने तेथील ग्रामस्थांना अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे.
तालुक्याच्या पूर्व परिसरात बीएसएनएलसह विविध खासगी कंपन्यांनी सेवा दिली आहे. गेल्या काही वर्षांत सदोष तंत्रज्ञानामुळे या सेवेत सातत्याने बिघाड हाेत आहे. काही टॉवरवरून थ्रीजी सेवा दिली जाईल, असे पूर्वी सांगितले गेले. मात्र, त्या टॉवरवरून टूजी सेवाही सुरळीत मिळत नाहीत. पाचलमध्ये तर बीएसएनएल सेवेचे दोन ते तीन टॉवर आहेत; पण एकाही टॉवरवरून सुरळीत सेवा मिळत नाही. त्या टॉवरच्या बाजूलाच इंटरनेट सेवा मिळत नाही असेही अनुभव येतात. रायपाटणमधील बीएसएनएल सेवेचा टॉवर उभारून बरेच दिवस झाले आहेत. त्याला विद्युत पुरवठाही जोडण्यात आला आहे; पण तो कार्यान्वित करण्यासाठी अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत; पण जर इंटरनेट सेवाच मिळत नसेल तर घरातून काम करायचे कसे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पाचल परिसरातील सर्व बँका, पोस्ट कार्यालय, एटीएम सेवा सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा यांनाही याचा फटका बसत आहे.