संगमेश्वर तालुक्यात १३ ठिकाणी लसीकरण केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:05+5:302021-03-24T04:29:05+5:30
सचिन मोहिते / देवरुख : संगमेश्वर तालुक्यात १३ ठिकाणी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रतिदिनी तेराशे ...

संगमेश्वर तालुक्यात १३ ठिकाणी लसीकरण केंद्रे
सचिन मोहिते / देवरुख : संगमेश्वर तालुक्यात १३ ठिकाणी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रतिदिनी तेराशे लोकांना लस देणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्यांना लस देणे गरजेचे आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. तालुक्यात आजपर्यंत ४,७४५ लोकांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
संगमेश्वर तालुक्यामध्ये २१ मार्चपर्यंत सात लसीकरण केंद्रे होती. मात्र, या केंद्रांमध्ये २२ मार्चपासून सहा केंद्रांची भर पडली आहे. यापूर्वी संगमेश्वर आणि देवरुख ग्रामीणमध्ये, तसेच साखरपा, सायले, कडवई आणि धामापूर अशी सात लसीकरणाची केंद्रे होती; तर नव्याने निवे, देवळे, बुरंबी, फुणगुस, माखजन आणि कोंड, उमरे या प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यात लसीकरणाची तेरा केंद्रे झाल्यामुळे आता दररोज प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १३०० लोकांना लस देणे शक्य होणार आहे.
२१ मार्चपर्यंत ४,७४५ लोकांना ही लस देण्यात आली आहे; तर ४५ ते ६० वयोगटातील ७,९४० आणि ६० वर्षांवरील २७,२३८ असे एकूण ३५,१७९ दुर्धर आजार असलेल्यांना लस प्राधान्याने देण्यात येणार आहे. यासाठी वाडीनिहाय नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांनी दिली.
काेट
दुर्धर आजार असलेल्यांना प्राधान्याने लस देण्यासाठी त्याचे वाडीनिहाय नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग आणि ग्राम कृती दल यांच्या माध्यमातून हे नियोजन झाले असून, याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. आपली आरोग्याची टीमदेखील उत्स्फूर्तपणे काम करीत आहे. नियोजनबद्ध काम सुरू असून दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींनी लस घेणे गरजेचे आहे.
- डॉ. एस. एस. सोनावणे, तालुका आरोग्याधिकारी