गुहागरात ३५८६ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST2021-03-23T04:33:31+5:302021-03-23T04:33:31+5:30
गुहागर : तालुक्यातून तालुका आरोग्य विभागाअंतर्गत तीन लसीकरण केंद्रातून २० मार्चपर्यंत पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील २ हजार ५८६ जणांचे लसीकरण ...

गुहागरात ३५८६ जणांचे लसीकरण
गुहागर : तालुक्यातून तालुका आरोग्य विभागाअंतर्गत तीन लसीकरण केंद्रातून २० मार्चपर्यंत पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील २ हजार ५८६ जणांचे लसीकरण झाले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी देवीदास चरके यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या गुहागर ग्रामीण रुग्णालयासह हेदवी व आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्र असे तीन लसीकरण केंद्र आहेत. पुढील काही दिवसांत कोळवली व तळवली अशा दोन केंद्रांची वाढ होणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी केंद्राद्वारे ही लस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. तालुक्यातून शृंगारतळी येथील डॉ. राजेंद्र पवार यांचे कै. विष्णुपंत पवार हॉस्पिटल या खासगी केंद्राचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून गेला आहे.
प्रामुख्याने शासकीय पातळीवरील ४५ वयोगटापुढील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. ४५ ते ५९ वयोगटामधील गंभीर आजार अनेक वर्षांपूर्वीचा वाढलेला मधुमेह अशा तत्सम आजारांची पार्श्वभूमी असलेल्यांनाच ही लस देण्यात येत आहे.
२० मार्चपासून २ हजार ५९६ जणांना ही लस देण्यात आली असून, यामध्ये १ हजार ९४६ जणांनी पहिला डोस, तर ६४० जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यासाठी सोमवार, बुधवार, शुक्रवार असे तीन वार देण्यात आले आहेत.
चौकट
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवीदास चरके यांनी सांगितले की, कोरोना विरोधी आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी हा डोस देण्यात येत आहे. अजूनही हा डोस घेण्याबाबत लोकांमध्ये उत्स्फूर्तपणा दिसून येत नाही. सर्वांनी स्वत:साठी व आपल्या कुटुंबासाठी हा डोस घेतलाच पाहिजे, असे आवाहन केले.