गोवंश हत्येसाठी मोकाट जनावरांचा वापर, पोलिसांनी आव्हान पेलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:27 PM2020-02-04T12:27:45+5:302020-02-04T12:31:39+5:30

चिपळुणातील गोवंश हत्येच्या घटनांनंतर रत्नागिरी पोलिसांसमोर आरोपींना पकडणे आव्हान होते. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, चेकपोस्टवर करण्यात आलेला कडक पहारा, तीन ठिकाणी करण्यात आलेली नाकाबंदी यामुळेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

The use of mock animals for killing cattle was challenged by the police | गोवंश हत्येसाठी मोकाट जनावरांचा वापर, पोलिसांनी आव्हान पेलले

गोवंश हत्येसाठी मोकाट जनावरांचा वापर, पोलिसांनी आव्हान पेलले

googlenewsNext
ठळक मुद्देगोवंश हत्येसाठी मोकाट जनावरांचा वापर, पोलिसांनी आव्हान पेललेगोवंश तस्करी रोखण्यासाठी सर्वसामान्यांची सामाजिक बांधिलकीही महत्वाची

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : चिपळुणातील गोवंश हत्येच्या घटनांनंतर रत्नागिरीपोलिसांसमोर आरोपींना पकडणे आव्हान होते. मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, चेकपोस्टवर करण्यात आलेला कडक पहारा, तीन ठिकाणी करण्यात आलेली नाकाबंदी यामुळेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

गोवंश हत्येसाठी केवळ मोकाट जनावरांचाच वापर केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गोवंश तस्करी रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपून साऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच हे प्रकार रोखता येऊ शकतात, असे मत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी व्यक्त केले.

मुंबई - गोवा महामार्गालगत चिपळूण तालुक्यातील कामथे हरेकरवाडी एस. टी. स्टॉपच्या बाजूला असलेल्या उंबरडोह ढोंडीचा टेप व पिंपळी खुर्द पायरवणे कॅनॉल या दोन्ही ठिकाणी गोवंश हत्या झाल्याचे प्रकार पुढे आले होते. गतवर्षी २६ जानेवारीला लोटे (ता. खेड) परिसरात गोवंश हत्येवरून जनप्रक्षोभ उसळला होता.

ग्रामस्थांच्या रास्ता रोकोमुळे वातावरण अधिकच चिघळले होते. पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता, तर जमावाने गाड्या जाळल्या होत्या. या प्रकारामुळे चिपळूण येथील प्रकरणांचा छडा लावताना पोलिसांसमोर आव्हान उभे होते.

या प्रकरणातील खरे आरोपी गजाआड करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी कंबर कसली. एकीकडे जनतेचा उद्रेक होऊ नये, यासाठी प्रयत्न करत असताना आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू होते.

पोलिसांनी या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी महामार्गावर असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यानंतर चिपळूण, गुहागर या भागात नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू केली.

त्यानंतर या घटनांमधील साम्य गोष्टींचा अभ्यास करून पोलिसांनी आपली व्यूहरचना तयार केली. या गुन्ह्याचे केंद्र मुंबईत असल्याचे कळताच पोलिसांनी तीन पथके तयार केली. मुंबई, पनवेल आणि मीरारोड या भागात ही तीन पथके कार्यरत केली आणि गुन्ह्याचा तपास सुरू झाला.

आरोपी मुंबईतच असल्याचे समजल्यानंतर मुंबईत सापळा रचण्यात आला. या सापळ्यात महंमद शाहीद सुलेमान कुरेशी (३९, रा. फ्लॅट नं. २०२, सीमा रेजन्सी, गोविंदनगर, मिरारोड पूर्व, मूळ रा. जगन्नाथ चाळ, जोगेश्वरी पूर्व) व शहजाद मकसूद चौधरी (३२, रा. रूम नं. ४०१, फातिमा बिल्डिंग, नोरेगाव, नालासोपारा पूर्व, जि. पालघर, मूळ रा. दिल्ली) या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

हे दोघे मुंबईतून गाडीने चिपळूण येथे येत होते. या परिसरातील मोकाट जनावरे हेरून त्यांची कत्तल करून त्यांच्या मांसाची मुंबईतच विक्री केली जात होती. केवळ पैसा कमविणे हाच त्यांचा उद्देश होता. या मांसाची विक्री अन्य कोठेही केली नसल्याचे तपास निष्पन्न झाले आहे. या दोघांवरही रायगड, रत्नागिरी, पालगड, ठाणे, पुणे, गुजरात राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.


घटना घडल्यानंतर वातावरण बिघडवून कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचणारे कृत्य करणे चुकीचे आहे. अशा घटनांनंतर संयमाने काम करून पोलिसांना सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करणे गरजेचे आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य आवश्यक आहे. पोलिसांच्या हातात हात घालून काम केल्यास निश्चितच गुन्ह्यांचा तपास करणे सोपे जाऊ शकते. त्यादृष्टीने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. प्रत्येकाला आपले अधिकार कळतात. पण कर्तव्यांची कळत नाही. कर्तव्याची जाणीव जेव्हा होईल तेव्हाच असे प्रकार थांबतील.
- विशाल गायकवाड,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक

एका रात्रीचे मिळायचे १ हजार ते ५ हजार

गोवंश हत्येचे काम करणाऱ्या माणसाला एका रात्रीचे १ ते ५ हजार रूपये इतके दिले जात होते. चिपळुणात येऊन गोवंश हत्या केल्यापासून ते मुंबईला परत जाईपर्यंतचा त्यांना हा मोबदला दिला जात होता. या कामासाठी बरोबर काही माणसेही आणली जात होती.

जनावरांवर इंजेक्शनचा वापर

गोवंश हत्येसाठी मोकाट सोडण्यात येणाऱ्या जनावरांचाच वापर केला जात होता. या भागातील मोकाट जनावरे हेरून त्यांना बेशुद्धीचे इंजेक्शन दिले जायचे. त्यानंतर त्यांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी नेले जात होते. या मांसाची मुंबईतच विक्री केली जात होती.

पोलीस पाटलांची बैठक

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना गावातील पाळीव जनावरे बेपत्ता आहेत का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली. गावात पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांचा शोधही घेण्यात आला. मात्र, अशी कोणतीच जनावरे बेपत्ता झालेली नसल्याचे पुढे आले होते.

पाणथळ जागा

गोवंश हत्येसाठी ज्याठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे, अशीच जागा ते शोधत होते. जनावर पकडून त्याची कत्तल केल्यानंतर नको असलेले भाग पाण्यात टाकले जात होते. जेणे करून ते पाण्याबरोबर वाहत जाऊन त्याचा कोणताही पुरावा त्याठिकाणी राहू नये. त्यानुसार या दोघांनी पाणथळाची जागा हेरून हे कृत्य केले.

काटेकोर नियोजन

गोवंश हत्येनंतर त्यांची वाहतूक करण्यासाठी गाडीची विशेष रचना करण्यात आलेली होती. गाडीच्या मागील बाजूला त्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आली होती. वाहतुकीदरम्यान रक्ताचे थेंब पडू नयेत, यासाठी जाड प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यात आलेला होता. त्या प्लास्टिक पिशवीत हे मांस ठेवून त्यांची वाहतूक करण्यात येत होती.

बंदोबस्तात आढळल्या अन्य वस्तू

पोलिसांनी या भागात बंदोबस्त कडक केल्यानंतर रात्रीच्या वेळी प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती. या तपासणीमध्ये पोलिसांना गोवा बनावटीची लाखो रूपयांची दारू सापडली, तर जनावरांची वाहतूक करणारा टेम्पोही पोलिसांच्या हाती लागला होता. गोवंश हत्येच्या तपासासाठी लावलेल्या बंदोबस्तात अन्य वस्तूही सापडल्याचे पुढे आले आहे.

चेकपोस्टवरील बंदोबस्तात बदल

कुंभार्ली, साखरपा आणि माणगाव या मार्गावरून ही वाहतूक होऊ शकते हे गृहीत याठिकाणच्या चेकपोस्टवरील बंदोबस्तात बदल करण्यात आला. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यालयातील पोलीसही तैनात करण्यात आले. प्रत्येक गाडीची कसून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे आरोपी नजरेतून सुटणे शक्य नव्हते.

स्थानिकांचा सहभाग नाहीच

या गुन्ह्यात स्थानिकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, पोलीस तपासात स्थानिकांचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघे मुंबईतून स्वत: येऊन मोकाट जनावरे शोधून त्यांची कत्तल करत होते. त्यामुळे असे गुन्हे घडल्यानंतर प्रक्षोभ करून स्थानिकांवर विनाकारण गुन्हे दाखल होण्याचे प्रकार घडतात. दोष नसतानाही त्यांना कोर्टकचेरी करावी लागते.
 

Web Title: The use of mock animals for killing cattle was challenged by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.