फवारणी पंपांची अनावश्यक खरेदी
By Admin | Updated: April 7, 2015 01:11 IST2015-04-06T22:55:13+5:302015-04-07T01:11:54+5:30
कृषी विभाग : शेतीपंप, रक्षक सापळ्यांपाठोपाठ आणखी एक गैरव्यवहार; नाल दिला, घोडा कुठाय?

फवारणी पंपांची अनावश्यक खरेदी
रत्नागिरी : फवारणी पंपाची अनावश्यक खरेदी करून ८०० शेतीपंप थेट तालुका कृषी कार्यालयाकडे वितरीत करण्यात आले आहेत. फवारणी पंप सुरू करण्यासाठी लागणारे दोन अश्वशक्तीचे मशीन मात्र शेतकऱ्यांना खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने ‘नाल देऊ केला आहे, मात्र घोडा शेतकऱ्यांना खरेदी करावा लागणार आहे’, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. पाच अश्वशक्तीचे ११९८ शेतीपंप तसेच रक्षक सापळ्याबरोबर अनावश्यक ८०० फवारणी पंपांची थेट खरेदी करून शेतकऱ्यांच्या माथी लादू पाहणाऱ्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने फवारणीपंपांची अनावश्यक खरेदी करून तिसरा गैरव्यवहारच केल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.राष्ट्रीय कृषीविकास योजनेंतर्गत एकात्मिक भात उत्पादक कार्यक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला. भातपिकाच्या रक्षणासाठी ७५ हजार ६०० रक्षक सापळे मागवण्यात आले. त्यासाठी ८ लाख ३१ हजार ६०० रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे सापळे भातकापणीनंतर उपलब्ध झाल्यामुळे हे सापळे अजूनही कृषी कार्यालयाच्या गोडावूनमध्येच पडून आहेत. पाच अश्वशक्तीच्या ११९८ शेतीपंपांची खरेदी कृषी कार्यालयाने केली आहे. पंपाची किमत २४ हजार असून, १० हजार अनुदान दिले तरी १४ हजार मात्र शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. याबाबत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यातच अनावश्यक फवारणी पंप खरेदी करून तालुका कृषी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत.फवारणी पंपाची किंमत आठ हजार रूपये आहे, तर पंप सुरू करण्यासाठी लागणारी दोन अश्वशक्तीची मशीन मात्र शेतकऱ्यांना स्वत: खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावे लागणार आहेत. शासनाकडून पंपासाठी केवळ चार हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असले तरी १४ हजार रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याचा भौगोलिक विचार करता, खरेदी करण्यात आलेले फवारणी पंप वापरले जाऊ शकत नाहीत. कोकणातील शेतकरी नॅपसॅक, ‘गटोर, फूट स्प्रेअर, पॉवरस्प्रेअरसारखेच फवारणी पंप वापरतात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने खरेदी केलेले फवारणी पंप सुरू करण्यासाठी दोन अश्वशक्तीची मशीन खरेदी करावी लागणार आहे. अन्यथा ट्रॅक्टर, पॉवर टिलरला जोडून सुरू केला जाऊ शकतोे. कोकणातील गरीब शेतकऱ्यांकडील शेतीचे क्षेत्रही गुंठ्यावर आहे. कमी आकारमानाच्या क्षेत्रात बारमाही शेती, उत्पादन घेतले जात नसल्यामुळे अशा प्रकारच्या पंपाचा वापर केला जाऊ शकत नाही.
जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवण्यात येत असून, कमिटीवर जिल्हाधिकारी अध्यक्ष, तर जिल्हा कृषी अधीक्षक सदस्य सचिव आहेत. शेतकऱ्यांकडून वैयक्तिक प्रस्ताव आल्यानंतरच त्यांना मान्यता दिली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतरच पॉवर टिलर, ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, ग्रासकटरसारखी यांत्रिक अवजारे मागवण्यात येतात किंवा शेतकऱ्यांना खरेदी करण्याची परवानगी देऊन अनुदान वितरीत केले जाते. यांत्रिक अवजारांसाठी तालुका कृषी कार्यालयांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविलेले प्रस्ताव धूळ खात पडले असून, ८०० फवारणी पंपांची खरेदीही अनावश्यकच असल्याचे स्पष्ट होत आहे. नऊ तालुका कृषी कार्यालयांकडे ८८ ते ९० फवारणी पंप विक्रीसाठी पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना हे पंप दाखवल्यानंतर ते नाकारले जात आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयावर फवारणी पंप विक्रीचा बोजा येऊन पडला आहे. (प्रतिनिधी)
उफराटा न्याय
पाच अश्वशक्तीचे ११९८ शेतीपंप तसेच रक्षक सापळ्याबरोबर अनावश्यक ८०० फवारणी पंपांची थेट खरेदी.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचा उफराटा न्याय.
फवारणी पंपाची किंमत आठ हजार रूपये तर पंप सुरू करण्यासाठी लागणारी दोन अश्वशक्तीची मशीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागणार १० हजार रूपये.