कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त घेणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:39+5:302021-08-21T04:36:39+5:30
रत्नागिरी : कोकण रेल्वेसाठी जमिनी कवडीमोल दराने दिल्या. कोकण रेल्वेमध्ये प्रत्येक कुटुंबप्रमुख म्हणून नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देऊन ...

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त घेणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट
रत्नागिरी : कोकण रेल्वेसाठी जमिनी कवडीमोल दराने दिल्या. कोकण रेल्वेमध्ये प्रत्येक कुटुंबप्रमुख म्हणून नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देऊन जमिनी घेतल्या. त्या सर्व कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजपर्यंत प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी कोकण रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेणार आहेत.
कोकण रेल्वेमध्ये चार हजार कामगार कंत्राटी पद्धतीने ठेकेदाराकडे काम करत आहेत. यावरून कोकण रेल्वेला मनुष्यबळाची गरज आहे, हे सिद्ध होते. कोकण रेल्वे कृती समितीने केलेल्या मागणीत या प्रकल्पग्रस्तांना १५ ते २० हजार पगार देऊन नोकरीत सामावून घ्यावे. कंत्राटी पद्धतीने काम करणा-यांच्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी कोकण रेल्वेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजतागायत सुटले नाहीत. यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पांडुरंग चव्हाण व कृती समिती संपर्कप्रमुख अतुल कुंभार व सनी मयेकर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेणार आहेत.