विनाअनुदानित शिक्षक वेतनापासून वंचित
By Admin | Updated: November 5, 2015 23:55 IST2015-11-05T23:17:36+5:302015-11-05T23:55:43+5:30
विनावेतन काम : राज्यातील २५ हजार शिक्षक

विनाअनुदानित शिक्षक वेतनापासून वंचित
आनंद त्रिपाठी --वाटूळ--शैक्षणिक वर्ष २००१पासून शासनाने राज्यातील शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यास प्रारंभ केला. त्यानुसार राज्यभरात १२ हजार तुकड्या कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरु करण्यात आल्या. २५ हजार शिक्षक या तुकड्यांवर २००१ पासून विनावेतन काम करीत असून, संस्थांकडून त्यांना तुटपुंजे वेतन मिळत आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या अथक परिश्रमानंतर व पाठपुराव्यामुळे फेब्रुवारी २०१४ साली या कायम विनाअनुदानित तुकड्यांचा ‘कायम’ हा शब्द शासनाने काढला व आॅनलाईन मूल्यांकनानंतर अनुदान देण्याची घोषणा केली. शासन निकषानुसार कायम विनाअनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकाची तीन वर्षांची मान्यता असायला हवी, अशी अट होती. पण संघटनेने ती एक वर्षाची मान्यता असावी, असा सूर लावून शिक्षण संचालकांची मान्यता मिळविली.
यानंतर जानेवारी २0१५ला शिक्षणाधिकारी, रत्नागिरी यांनी मूल्यमापनासाठी शाळांचे प्रस्ताव मागवले होते. परंतु हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालक कार्यालयात एकही प्रस्ताव न पाठवल्याने जिल्ह्यातील एकही शाळा आॅनलाईन मूल्यांकनास पात्र ठरली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश औताडे यांनी
सांगितले.
शाळांकडूनच योग्य प्रकारे प्रस्ताव सादर न झाल्याने शाळा पात्र ठरल्या नाहीत. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने पुन्हा हा प्रश्न लावून धरला असून, विनाअनुदानित तुकड्यांवरील शिक्षक व शाळांना अनुदानावर येण्यासाठी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रा. प्रकाश औताडे यांनी केले आहे.
कॉलेजची भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची माहिती, विनाअनुदानित तुकड्यांची शासनाकडून मान्यता (किमान ४ वर्षे) अशा तुकड्यांवर नियुक्त शिक्षकांची नेमणूक व त्याला शिक्षण उपसचांलकांची मान्यता, कोकण आयुक्तांकडून रोस्टर तपासून त्याप्रमाणे नेमणुका असणे गरजेचे आहे.
अपूर्ण प्रस्ताव : जिल्ह्यातील तुकडी नाही
जिल्ह्यातील एकही तुकडी मूल्यांकनास पात्र ठरली नाही. हे केवळ अपूर्ण प्रस्तावामुळेच. उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून वैयक्तिक मान्यता कॅम्प लावण्याच्या प्रयत्न आहे. परंतु, २०१४-१५ व २०१५-१६ची संचमान्यता असेल तरच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता होतील.
- प्रा. प्रकाश औताडे,
अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना.
डिसेंबरला मूल्यमापन
कॉलेजचे निकाल व शिक्षकांची पात्रता या अटी पूर्ण असणे गरजेचे आहे. डिसेंबर २0१५मध्ये पुन्हा एकदा अशा तुकड्यांचे मूल्यमापन होणार आहे.