दापाेली : दापाेली नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी पक्षाची साथ साेडून उद्धव ठाकरे यांना चपराक दिली आहे. या नगर पंचायतीत आता शिंदे सेनेचाच नगराध्यक्ष विराजमान हाेणार आहे. ही तर सुरुवात असून, संपूर्ण काेकणातून उद्धव सेनेला हद्दपार केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा माजी मंत्री रामदास कदम यांनी दापाेली येथे दिला.दापाेली नगर पंचायतीतील उद्धव सेनेतील १२ नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदे सेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी ते बाेलत हाेते. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला म्हणजेच योगेश कदम याला आणि मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये २५,००० मतांनी योगेश कदम यांना निवडून दिले. तसेच पक्षप्रमुखांनीही त्याची नोंद घेऊन ७ खाती देऊन राज्यमंत्री पद दिले. कोकणातील जनता पुन्हा शिंदे सेनेत येऊ लागली आहे. कोकणातल्या जनतेची बाळासाहेबांच्या शिवसेनेशी नाळ फार पूर्वीपासून जुळलेली आहे, असे ते म्हणाले.
आम्हाला संपवायला निघाले हाेते, आता..
ते पुढे म्हणाले की, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी योगेश कदम यांच्या कामाचा तडाखा बघून पक्षामध्ये प्रवेश केला आहे. येत्या थोड्याच दिवसांत दापोली नगरपंचायतीवर शिंदे सेनेचाच नगराध्यक्ष असेल ही उद्धव ठाकरे यांना दिलेली राजकीय चपराक आहे. उद्धव ठाकरे आम्हाला राजकारणातून संपवायला निघाले हाेते. आता उद्धव ठाकरे यांनाच कोकणातून उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही, अशी टीका रामदास कदम यांनी केली.
दापोलीतील पाण्याचा प्रश्न १५ दिवसात सोडवा
दापोली विकासाच्या दृष्टीने आझाद मैदान, स्टेडियम, नाट्यगृह उभे राहण्याच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. तसेच दापोलीतील पाण्याचा प्रश्न येत्या १५ दिवसात सोडवावा, अशी सूचना रामदास कदम यांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली.