भरणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST2021-05-26T04:32:06+5:302021-05-26T04:32:06+5:30

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे सोमवारी रात्री ९ वाजता महामार्ग बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून ...

Two-wheeler killed in filling accident | भरणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरणेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे सोमवारी रात्री ९ वाजता महामार्ग बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात भोस्ते येथील सर्फराज हानिफ जसनाईक याचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर सर्फराज जसनाईक दि. २४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकी (एम एच ०८ ए एम १५८७) वरून कळंबणीहून खेडच्या दिशेने येत होता. महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असलेल्या पुलाजवळ मातीच्या ढिगाऱ्यावर त्याची दुचाकी धडकून अपघात झाला. या अपघातात जसनाईक पुलावरून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.

घटनास्थळी पोहोचलेले सामाजिक कार्यकर्ते रहीम सईबोले यांच्यासह नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून जसनाईक याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चिपळूण येथे नेत असताना वाटेतच जसनाईक याचा मृत्यू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथील पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. गेल्या अडीच महिन्यापासून या ठिकाणी पुलाचे काम सुरू होते. मात्र काही दिवसापासून हे काम अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आले आहे. या ठिकाणी रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद करणे गरजेचे होते. मात्र केवळ मुंबईच्या दिशेला दोन छोटे बॅरिकेड्स‌ टाकून वाहतूक वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याउलट खेडच्या दिशेला मात्र रस्त्यावर मातीचा ढीग टाकून वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूकही पर्यायी मार्गाकडे सुरक्षित वळविण्याची गरज आहे.

..............................

दोन महिन्यात चार अपघात

भरणे शिंदेवाडी येथील अपूर्णावस्थेतील पुलाजवळ तीन दुचाकीसह एका कारला गेल्या दोन महिन्यात अपघात झाला आहे. या ठिकाणी झालेल्या चार अपघातात आतापर्यंत दोघांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी अपघातात जखमी झालेल्या दोन पुरुषांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे. एक दुचाकीस्वार महिला याच ठिकाणी अपघातग्रस्त होऊन या अर्धवट पुलावरून खाली कोसळली होती. खेडच्या दिशेने येणारी इनोव्हा मोटार पुलाजवळ असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला धडकून अपघातग्रस्त झाली होती. केवळ ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे या ठिकाणी दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे या अपघातांना जबाबदार धरून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.

Web Title: Two-wheeler killed in filling accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.