रत्नागिरीतील भाट्ये खाडीत बुडून दाेघांचा मृत्यू

By अरुण आडिवरेकर | Updated: April 16, 2023 18:47 IST2023-04-16T18:46:39+5:302023-04-16T18:47:56+5:30

खाडीत मासे पकडत असतानाच दाेघे पुलाखाली पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले.

Two died after drowning in Bhatye creek in Ratnagiri | रत्नागिरीतील भाट्ये खाडीत बुडून दाेघांचा मृत्यू

रत्नागिरीतील भाट्ये खाडीत बुडून दाेघांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : खाडीत पाेहण्यासाठी उतरलेल्या दाेघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१६ एप्रिल) राेजी रत्नागिरी शहरानजिकच्या भाट्ये खाडीत दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. रेहान अब्दुल्ला शेख (११, रा. क्रांतीनगर, झाेपडपट्टी, रत्नागिरी) व प्रणय रघुनाथ जाधव (२४, रा. काेकणनगर, रत्नागिरी) अशी दाेघांची नावे आहेत.

याबाबत मतीन अमीरुद्दीन साेलकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी पाेलिसांना माहिती दिली. रेहान शेख व प्रणय जाधव हे दोघे भाट्ये खाडीत खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेले हाेते. खाडीत मासे पकडत असतानाच दाेघे पुलाखाली पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले. त्या दाेघांना बुडताना तेथीलच एका मुलाने पाहिले. त्याने आरडाओरड केली असता मतीन साेलकर, दिलदार कासम पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मतीन साेलकर व दिलदार पावसकर यांनी रेहान व प्रणय पाण्याबाहेर काढून अत्यवस्थ अवस्थेत दाेघांनाही जिल्हा रुगणालयात दाखल केले. मात्र, पोटात पाणी गेल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेबाबत माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

Web Title: Two died after drowning in Bhatye creek in Ratnagiri